पार्किंग नसलेल्या कोचिंग क्लासेसवरही पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2016 01:34 AM2016-05-01T01:34:54+5:302016-05-01T01:44:24+5:30
औरंगाबाद : मंगल कार्यालये, लॉन्स व हॉटेल्सपाठोपाठ आता शहरातील कोचिंग क्लासेसही पोलीस आयुक्तांच्या रडारवर आहेत. ज्या क्लासेसच्या पार्किंगमुळे सार्वजनिक वाहतूक ठप्प होत आहे,
औरंगाबाद : मंगल कार्यालये, लॉन्स व हॉटेल्सपाठोपाठ आता शहरातील कोचिंग क्लासेसही पोलीस आयुक्तांच्या रडारवर आहेत. ज्या क्लासेसच्या पार्किंगमुळे सार्वजनिक वाहतूक ठप्प होत आहे, अशा क्लासेसचा पोलिसांनी सर्व्हे सुरू केला आहे. सर्व्हेनंतर यासंदर्भात उपाययोजना करण्याची त्यांना मुदत दिली जाईल. सदरील कालावधीत त्यांनी उपाय केले नाही तर त्यांच्यावर हॉटेल, लॉन्स व मंगल कार्यालयांसारखी कारवाई करण्यात येणार आहे.
रस्त्यावर वाहने उभे करीत असल्याने शहरातील वाहतुकीचे तीनतेरा वाजलेले आहे. लग्नसमारंभांमुळे सतत वाहतूक ठप्प होत असल्याचे प्रकार घडत आहेत. याकरिता अमितेशकुमार यांनी कडक भूमिका घेतली आहे. त्यासाठी दोन दिवसांपूर्वी त्यांनी शहरातील हॉटेल्स, मंगल कार्यालये व लॉन्स संचालक व व्यवस्थापकांची बैठक घेतली. त्यामध्ये रस्त्यावर वाहने उभी राहणार नाही ही संपूर्ण जबाबदारी तुमचीच राहील.
वाहने आढळून आली तर थेट संचालकांवर कारवाई केली जाईल. तसेच १२ मेपासून कायमचे सील करण्याचीही कारवाई केली जाईल, असा इशारा दिलेला आहे.
त्याचबरोबर शहरात खाजगी कोचिंग क्लासेसची संख्याही खूप मोठ्या प्रमाणात आहे. काही क्लास चालकांकडे स्वत:ची पार्किंग व्यवस्थाच नाही. त्यामुळे रस्त्याच्या बाजूलाच विद्यार्थ्यांची वाहने उभी राहतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. याकरिता पोलीस आयुक्तांनी हा सर्व्हे सुरू करण्याचा आदेश दिला आहे. संबंधित पोलीस स्टेशन, वाहतूक शाखा, चार्ली व पीसीआर मोबाईलमार्फत हा सर्व्हे सुरू आहे. या सर्व्हेनंतर त्यांची बैठक घेऊन, १५ ते २० दिवसांची मुदत दिली जाणार आहे.
क्लासेस चालकांची पार्किंग रस्त्यावर असल्याने सोसायटीतील रहिवाशांना त्रास होतो. त्याचबरोबर वाहतुकीलाही अडथळा निर्माण होतो. याकरिता आम्ही अशा क्लासेसचा सर्व्हे सुरू के ला आहे. यानंतर त्यांना उपाययोजना करण्यासाठी मुदत दिली जाणार आहे. त्यांनी या मुदतीत पार्किंगची व्यवस्था केली नाही तर त्यांच्यावर पुढील कारवाई केली जाईल.
- अमितेशकुमार, पोलीस आयुक्त