पोलिसांच्या कारवाईची ‘कोंडी’
By Admin | Published: May 25, 2016 12:27 AM2016-05-25T00:27:20+5:302016-05-25T00:30:20+5:30
औरंगाबाद : बऱ्याच वर्षांनंतर अखेर मंगळवारी वाहतूक शाखा पोलिसांनी ‘खाक्या’ दाखवीत का होईना रोशनगेट रोडवरील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी ‘साफसफाई’ मोहीम राबविली.
औरंगाबाद : बऱ्याच वर्षांनंतर अखेर मंगळवारी वाहतूक शाखा पोलिसांनी ‘खाक्या’ दाखवीत का होईना रोशनगेट रोडवरील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी ‘साफसफाई’ मोहीम राबविली. अनेक वर्षांपासून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर पोलीस कारवाई करीत असतानाच एमआयएमच्या पदाधिकारी, नगरसेवकांनी मात्र, राडेबाजी करीत, धुडगूस घालीत पोलिसांच्या या मोहिमेचीच ‘कोंडी’ करण्याचा प्रयत्न केला. अखेर धुडगूस घालणाऱ्या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना बळाचा सौम्य वापर करावा लागला. त्यामुळे रोशनगेट भागात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.
रोशनगेट, किराडपुरा, मौलाना आझाद चौक, चेलीपुरा रोडवर अनेक ठिकाणी रस्त्यात अनेक वर्षांपासून भंगार, जुनी वाहने उभी करून ठेवलेली आहे. शिवाय आसपासचे दुकानदारही रस्त्यावरच वाहने उभी करतात. फेरीवालेही हा रस्ता व्यापून घेतात. त्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीची सातत्याने कोंडी होते. हा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू आहे.
सध्या वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर कारवाईची मोहीमच वाहतूक शाखा पोलिसांनी हाती घेतलेली आहे. सतत कोणत्या ना कोणत्या भागात ही मोहीम राबविण्यात येत आहे. मंगळवारी शहर वाहतूक शाखेने सकाळच्या वेळी अखेर रोशनगेट परिसराकडे मोर्चा वळविला. या रस्यावर गेल्या अनेक वर्षांमध्ये पोलिसांनी कारवाई केलेली नव्हती. वाहतूक शाखेचे निरीक्षक मुदिराज, सहायक निरीक्षक (पान २ वर)
मोहीम सुरूच राहणार
रोशनगेट, चंपाचौक, चेलीपुरा, मौलाना आझाद चौक, कटकटगेट, शहागंज आणि परिसरात वाहतुकीचा सतत खोळंबा होत असतो. ही कोंडी फोडण्यासाठी यापुढेही सतत अशी मोहीम सुरूच ठेवण्यात येणार आहे. या चांगल्या कामाला सर्वांचे सहकार्य मिळेल. जर ही मोहीम राबविताना पोलिसांकडून मारहाण, तोडफोड झाली असेल तर त्याची चौकशी करू.
- अमितेशकुमार (पोलीस आयुक्त)
जमावातील या गर्दीतून कुणी तरी पोलीस विनाकारण आम्हाला त्रास देत आहेत, दादागिरी करीत आहेत, असे म्हणत मारो इनको, अशी चिथावणी दिली. त्यामुळे जमाव बिथरला. आक्रमक जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्याचे प्रत्यक्षदर्र्शींनी सांगितले. या गोंधळामुळे धावपळ उडाली. परिसरात चांगलाच तणाव निर्माण झाला. नंतर घटनास्थळी मोठा पोलीस फौजफाटा दाखल झाल्याने जमाव पांगला.
रस्ता झाला ‘साफ’
४जिन्सी चौक ते रोशनगेट रस्त्यावर अनेक वर्षांपासून अनेक भंगार वाहने पडलेली होती. त्यातील तीन वाहने पोलिसांनी या कारवाईत जप्त केली. अन्य अनेक वाहने नागरिकांनी तेथून काढून घेतली, तर रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या रिक्षा, इतर वाहने, अशी सुमारे अडीचशे वाहने येथून हटविण्यात आली. त्यामुळे हा रस्ता अनेक वर्षांनंतर ‘साफ’ झाला.
पोलिसांवरच आरोप
या धावपळीत एक मुलगा जखमी झाला. त्यानंतर जमाव अधिक चिडला. पोलिसांनी या मुलाला मारहाण केली. शिवाय वाहतूक शाखेच्या पोलिसांनी रोशनगेटवर येताच रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांच्या थेट काचा फोडल्या.
रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना मारहाण केली, पोलीस दादागिरी करीत आहेत, असा आरोप करीत एमआयएमच्या नगरसेवकांनी जमाव घेऊन थेट जिन्सी पोलीस ठाणे गाठले. पोलीस ठाण्यात या जमावाने चांगलाच गोंधळ घातला. सहायक निरीक्षक शेख अकमल यांच्याविरुद्ध कारवाई करा, गुन्हा नोंदवा, अशी मागणी या जमावाने केली.