थर्टीफर्स्टसाठी पोलीस अलर्ट; शहरात तब्बल तीन हजार पोलीस केले जाणार तैनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 06:48 PM2018-12-31T18:48:06+5:302018-12-31T18:51:21+5:30
कोरेगाव-भीमा दंगलीची वर्षपूर्ती अन् थर्टीफर्स्टसाठी शहर पोलीस अलर्ट
औरंगाबाद : कोरेगाव-भीमा येथील घटनेचे तीव्र पडसाद औरंगाबादेत गतवर्षी नववर्षदिनीच उमटले होते. या दंगलीची वर्षपूर्ती आणि थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस अलर्ट झाले आहेत. नववर्षाचे स्वागत जल्लोषात आणि शांततेत व्हावे, यासाठी ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी रोजी शहरात तब्बल तीन हजार पोलीस तैनात केले जाणार आहे. शिवाय संवेदन आणि अतिसेवंदनशील ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ७२ ठिकाणी फिक्स पॉइट लावण्यात आले.
सहायक पोलीस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे म्हणाले की,मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी शहरवासियांनी तयारी सुरू केली आहे. १ जानेवारी रोजी सर्वत्र शौर्य दिनही साजरा होणार आहे. नागरिकांच्या आनंदात काही विघ्न येऊ नये म्हणून सर्व पोलीस दलही सज्ज झाले आहेत. ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी रोजी शहरात ६५ ठिकाणी फिक्स पॉइंट लावण्यात आले आहेत. प्रत्येक पॉर्इंटवर एक फौजदार आणि पाच कर्मचारी नेमण्यात आले. तर शहराचे प्रवेशद्वार असलेल्या विविध ६ ठिकाणी वाहनांची नाकांबदी केली जाणार आहेत. शहरात येणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी करून वाहनांना प्रवेश दिला जाणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
मद्यपी वाहनचालकांवर होणार कारवाई
नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी अति उत्साही लोक मद्य प्राशन करून वाहने चालवितात. दारू पिऊन वाहन चालविणारा स्वत:सोबत अन्य वाहनचालकांचे प्राण धोक्यात घालतो, यामुळे मद्यपी वाहनचालकांवर कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी विशेष पथके स्थापन क रण्यात आल्याचे डॉ. कोडे म्हणाले.
पहाटे पाचपर्यंत बार खुले
दारू पिऊन थर्टीफर्स्ट साजर करणाऱ्यांसाठी पहाटे पाचपर्यंत बीअर बार उघडे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवाय दारू दुकानेही रात्री १ वाजेपर्यंत खुली राहणार आहेत, अशी माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली.
बेकायदा दारूविक्रीवर लक्ष
बेकायदा दारूविक्रे त्यांवर लक्ष ठेवण्यासाठी गुन्हे शाखेसह विविध ठाण्यांची स्वतंत्र दोन पथके कार्यरत राहणार आहेत. प्रत्येक पथकामध्ये १ अधिकारी आणि पाच कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
सहा ठिकाणी नाकाबंदी
शहराच्या शांततेला बाधा पोहोचविण्याच्या उद्देशाने बाहेरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी हर्सूल नाका, जालना नाका, बीड नाका, पैठण रस्त्यावरील नाका, दौलताबाद टी-पॉइंट आणि वाळूज नाका आदी ठिकाणी तपासणी नाके(चेक पोस्ट) लावण्यात येणार आहेत. तेथे प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जाईल.