दुचाकीस्वार महिलेला चिरडणारी बस व चालकही पोलिसांना सापडेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 04:44 PM2020-01-20T16:44:13+5:302020-01-20T16:46:02+5:30
एका महिलेचा बळी घेणारे हे वाहन खाजगी ट्रान्स्पोर्ट कंपनीचे असल्याची चर्चा आहे.
औरंगाबाद : रस्त्यात पडलेले केबल अडकल्याने खाली पडलेल्या दुचाकीस्वार महिलेला चिरडल्यानंतर घटनास्थळावरून बससह पसार झालेला चालक घटनेच्या ३६ तासांनंतरही पोलिसांना सापडला नाही. एका महिलेचा बळी घेणारे हे वाहन खाजगी ट्रान्स्पोर्ट कंपनीचे असल्याची चर्चा आहे. मात्र, या बसचा क्रमांक एकाही प्रत्यक्षदर्शीने पाहिला नाही. यामुळे घटनेच्या दुसऱ्या दिवशीही पोलिसांना बसपर्यंत पोहोचता आले नाही.
दुचाकीने व्यायामशाळेत जाणाऱ्या ललिता शंकर ढगे (३९,रा. कासलीवाल पूर्व, चिकलठाणा) यांना शनिवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास भरधाव बसने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. याविषयी मृताचा पुतण्या कार्तिक पुंडलिक ढगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुकुंदवाडी ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदविला. ललिता यांचे शवविच्छेदन करून नातेवाईकांनी त्यांचा मृतदेह अंत्यविधीसाठी गावी नेला. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील चव्हाण आणि कर्मचारी करीत आहेत. घटना घडल्यापासून ते रविवारी रात्री उशिरापर्यंत पोलिसांच्या पथकाने जालना रोडवरील विविध इमारतींवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज हस्तगत केले. या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी पोलीस करीत आहेत.
दरम्यान, घटनास्थळाचा पंचनामा केला. प्रत्यक्षदर्शींकडे संबंधित बसबाबत विचारपूस करीत आहेत. मात्र, अद्याप बसचा क्रमांक सांगणारा एकही प्रत्यक्षदर्शींसमोर आला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार ललिता यांना उडविणारी बस पांढऱ्या रंगाची आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून सकाळी ८ ते ९ या कालावधीत जालना रोडने जाणाऱ्या बसचे क्रमांक मिळविले आहेत. आता प्रत्येक बसच्या चालकाची चौकशी केली जात असल्याची माहिती उपनिरीक्षक चव्हाण यांनी दिली.
अपघाताला कारणीभूत ठरलेले केबल अखेर काढले
अपघाताला कारणीभूत ठरलेल्या पथदिव्याच्या खांबावरून रस्त्यावर पडलेले इलेक्ट्रिक केबल, तार आणि मांजा रविवारी सकाळी घटनास्थळावरून हटविण्यात आला. हे केबल वायर पोलिसांनी जप्त करण्यापूर्वीच महापालिकेने काढून नेल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलिसांनी त्या केबल वायरची छायाचित्रे काढली होती.