प्रेमभंग ‘ती’चा अन् निद्रानाश पोलिसांचा...!

By Admin | Published: May 4, 2016 01:22 AM2016-05-04T01:22:57+5:302016-05-04T01:31:11+5:30

औरंगाबाद : एका तरुणीच्या ‘प्रेमभंगा’ने सोमवारी रात्री पोलिसांची झोपच ‘भंग’ करून टाकली. तिने नैराश्यातून शहरातील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टरला

The police and the police ...! | प्रेमभंग ‘ती’चा अन् निद्रानाश पोलिसांचा...!

प्रेमभंग ‘ती’चा अन् निद्रानाश पोलिसांचा...!

googlenewsNext


औरंगाबाद : एका तरुणीच्या ‘प्रेमभंगा’ने सोमवारी रात्री पोलिसांची झोपच ‘भंग’ करून टाकली. तिने नैराश्यातून शहरातील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टरला रात्री फोन केला ‘साहेब माला हृदय दान करायचे आहे, थोड्याच वेळात मी मरणार आहे...’ हे ऐकताच डॉक्टर हादरले. त्यांनी पोलिसांशी तात्काळ संपर्क साधला अन् मग एक जीव वाचविण्यासाठी रात्री सव्वाआठ वाजता सुरू झाली ‘त्या’ महिलेची शोधमोहीम... अखेर मोबाईलवरून मिळविलेला एक-एक धागादोरा जुळवीत पोलीस पथक रात्री पावणेदोन वाजता तिच्या घरी धडकले अन् प्रेमभंग नाट्यावर पडदा पडला...
त्याचे झाले असे की, सोमवारी रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास एका डॉक्टरांच्या मोबाईलवर अनोळखी क्रमांकावरून फोन आला. डॉक्टरांनी फोन उचलला. तिकडून महिला बोलली. ती म्हणाली ‘साहेब मला हृदय दान करायचे आहे’ हे ऐकताच डॉक्टर हादरले. ‘अहो, जिवंत व्यक्तीचे अवयव दान करता येत नसतात,’ असे त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. त्यावर महिलेने ‘डॉक्टर साहेब, थोड्याच वेळात मी मरणार आहे. मेल्यानंतर तर करता येते ना हृदय दान,’ असे उत्तर देत तिने फोन कट केला. या फोनवरून ती महिला प्रचंड तणावाखाली आणि नैराश्यात असून आता ती आत्महत्या करणार आहे, हे डॉक्टरांच्या लक्षात आले.
डॉक्टरांनी तिचा जीव वाचवावा म्हणून तात्काळ गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त खुशालचंद बाहेती यांच्याशी संपर्क साधून या फोनबाबत माहिती दिली. तसे पाहिले तर आत्महत्या झाल्यानंतर कारवाई करणे ही पोलिसांची जबाबदारी; परंतु माणुसकीच्या नात्याने एका महिलेचा जीव वाचवावा, या उद्देशाने अख्खी गुन्हे शाखा, विशेष शाखा, खुद्द उपायुक्त संदीप आटोळे, सहायक आयुक्त बाहेती ‘त्या’ महिलेच्या शोधमोहिमेत (पान २ वर)
ही ३० वर्षीय तरुणी अविवाहित आहे. हडको परिसरात किरायाच्या घरात ती राहते. तिचे एका तरुणावर प्रेम होते; परंतु त्या तरुणाने दुसरीसोबतच विवाह केला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ती प्रचंड तणाव आणि नैराश्यात होती. त्यातूनच तिने आत्महत्येचा विचार केला. मग तिने प्रेमभंगामुळे हृदय तुटल्याने हृदय दान करावे, असा निर्णय घेतला आणि आत्महत्येपूर्वी ‘त्या’ डॉक्टरचा मोबाईल क्रमांक मिळवून आपले हृदय दान करण्याची इच्छा व्यक्त केली.
मात्र, वेळीच पोलीस पोहोचले, असे चौकशीत स्पष्ट झाले. मग पोलिसांनी तिचे समुपदेशन केले. तेव्हा तिने आत्महत्येचा निर्णय बदलला, असे सहायक पोलीस आयुक्त खुशालचंद बाहेती यांनी सांगितले. तिचा जीव वाजविण्यासाठी उपायुक्त संदीप आटोळे, सहायक आयुक्त बाहेती, विशेष शाखेच्या सहायक निरीक्षक अर्चना पाटील, सायबरचे फौजदार नितीन आंधळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Web Title: The police and the police ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.