चक्क पोलीस बंदोबस्तात होतेय दारूविक्री!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 07:04 AM2019-01-09T07:04:58+5:302019-01-09T07:05:25+5:30
औरंगाबादमधील प्रकार : अतिमद्यप्राशनाने एकाचा मृत्यू झाल्यामुळे स्थानिकांमध्ये रोष
औरंगाबाद : एरवी दारूच्या दुकानांवर कारवाई करण्यासाठी जाणाऱ्या पोलिसांवर सोमवारी चक्क दारु दुकानाला बंदोबस्त देण्याची पाळी आली. अतिमद्यप्राशनामुळे एकाचा मृत्यू झाल्याने संतप्त नागरिकांनी सोमवारी विजयनगर चौकातील देशी दारू दुकानाची मोडतोड केली होती. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांनी दुकानमालकाच्या तक्रारीवरून आंदोलक महिला आणि पुरुषांविरोधात दंगलीचा गुन्हा नोंदविला. काही आंदोलकांना अटकही केली.
या देशी दारू दुकानाबद्दल अनेक तक्रारी पोलीस आणि जिल्हा प्रशासनाला नागरिकांनी दिलेल्या आहेत. एका नागरिकाचा मृत्यू झाल्यामुळे नागरिकांचा रोष उफाळून आला. एखाद्या दुकानामुळे कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल, तर ते तातडीने बंद करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत. मात्र, पुंडलिकनगर ठाणेदार महाशयांनी दारू दुकानदारांवर मेहेर नजर दाखवीत चक्क दुकानालाच सशस्त्र पोलिसांचे संरक्षण दिले. २४ तास पोलिसांची मोठी व्हॅन त्या दुकानासमोर उभी होती.
पोलिसांचीही दुकानात ये-जा
बंदोबस्तावरील काही पोलीस चक्क दारू दुकानात ये-जा करीत होते. पोलिसांच्या साक्षीने दुकानदार ग्राहकांना दारूविक्री करीत होता. या प्रकारांची विजय चौकात चर्चा होती.