पैठणमध्ये वाळू तस्करांना पोलिसांचे मिळतेय अभय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 11:48 PM2017-12-28T23:48:42+5:302017-12-28T23:49:08+5:30
पोलीस व महसूल यंत्रणेकडून अभय मिळत असल्याने काही काळ कडकडीत बंद असलेल्या वाळूतस्करीच्या धंद्यात पैठण परिसरातील गोदावरी नदीपात्रात वाळूतस्करांनी पुन्हा डोके वर काढले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : पोलीस व महसूल यंत्रणेकडून अभय मिळत असल्याने काही काळ कडकडीत बंद असलेल्या वाळूतस्करीच्या धंद्यात पैठण परिसरातील गोदावरी नदीपात्रात वाळूतस्करांनी पुन्हा डोके वर काढले आहे. विशेष म्हणजे वाळूच्या धंद्यात जर्जर झालेल्या जुन्या तस्करांनी या धंद्यातून माघार घेतलेली असताना अधिकाºयांचा ‘आशीर्वाद’ घेत या धंद्यात नवीन युवकांची फळी उतरली आहे. या फळीकडून वाळूच्या गोरखधंद्याचे व्यवस्थापन करण्यात येत आहे. दररोज लाखो रुपयांची वाळू गोदावरीच्या नदीपात्रातून ओरबडली जात आहे. असे असताना महसूल व पोलीस अधिकारी मात्र सर्व आलबेल असल्याचा दावा करीत आहेत.
आरी व केणीने उपसा
रात्रभर केणी, आरी नावाचे यंत्र ट्रॅक्टरला लावून गोदावरीच्या नदीपात्रातील पाण्यातून वाळूचा अवैध उपसा करण्यात येत आहे. सदरील उपशाचे ढीग गोदावरी काठावर ठिकठिकाणी करण्यात येत आहेत. याठिकाणी ट्रक, ट्रॅक्टर, हायवा, बैलगाडी, अॅपेरिक्षा, बैलगाडीत ही वाळू भरून ग्राहकापर्यंत पोहोच केली जात आहे.
शेवगाव व पैठण तालुका
नवीन बाजारपेठ
औरंगाबाद शहरात वाळू घेऊन जाणे कठीण झाल्याने वाळूतस्करांनी वाळूची बाजारपेठ बदलली असून, वाळूची विक्री पैठण शहर, पैठण तालुका व पैठण तालुक्याला लागून असलेल्या शेवगाव तालुक्यात करण्यात येत आहे. पैठण व शेवगाव तालुक्यात सुरू असलेल्या बांधकामास पैठणची वाळू पुरविली जात आहे. रात्रीच्या वेळी बिनबोभाटपणे वाळूची वाहतूक करण्यात येत आहे.
गोदापात्रावर तस्करांचा ताबा
गोदावरी नदीपात्राचा वाळूचोरांनी ताबा घेतला असून, पैठण नाथ मंदिराच्या पाठीमागील नदीच्या पलीकडे असलेल्या कावसान (जुने) परिसरात यंत्राचा वापर करून वाळू ओरबाडली जात आहे. शहरापासून काही अंतरावर असलेल्या वडवाळी, नायगाव व मायगाव येथील वाळूपट्ट्यांमध्ये खुलेआम वाळूचा अवैध उपसा करण्यात येत आहे. स्थानिक गावपुढारी व (पान २ वर)
वाळूला आला सोन्याचा भाव
वाळूपट्टे बंद असल्याने सध्या वाळूला विक्रमी भाव मिळत आहे. आज रोजी बैलगाडी भरून वाळू ९०० रुपये, तर एक ट्रॅक्टर वाळू ३,००० रुपये अशा भावाने विक्री करण्यात येत आहे. हायवा ट्रक भरून वाळू ४० हजार रुपयांना विकली जात आहे. पैठण परिसरात २५ ट्रक, ३० ते ३५ ट्रॅक्टर व ३० ते ४० केणी मशीन अनधिकृत परवानगीने सुरू आहे.
पोलिसांनी कारवाई करावी -तहसीलदार
याबाबत तहसीलदार महेश सावंत म्हणाले की, मी खाजगी वाहनाने कारवाई करीत आहे. असे असले तरी पैठण पोलिसांना रात्री गस्त घालताना वाळूचे वाहन दिसून आल्यास कारवाई करण्याचे सांगण्यात आले आहे.
येथे होतो अवैध वाळू उपसा
कावसान, आपेगाव, वडवाळी, मायगाव नायगाव, नवगाव, दादेगाव, पाटेगाव, आयटीआय परिसर, हिरडपुरी, टाकळी अंबड आदी परिसरात गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळूचा उपसा करण्यात येत आहे. याशिवाय तालुक्यातील छोट्या-मोठ्या नद्या, ओढे यातूनही उपसा करण्यात येत आहे.
पैठणच्या तहसीलदारांना वाहन नाही
वाळूचोरीस प्रतिबंध व कारवाई करण्यासाठी पैठणच्या तहसीलदारांना वाहनच उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. जवळपास वर्षभरापासून पैठणचे तहसीलदार खाजगी कारचा वापर करीत आहेत. यामुळे तहसीलदारांच्या कारवाईस मर्यादा आल्या आहेत. या कारणानेही वाळूतस्करांचे चांगलेच फावले आहे. वाळूपट्ट्याने संपन्न असलेल्या तालुक्यातील तहसीलदारांना महसूल प्रशासन वाहन उपलब्ध का करून देत नाही, असा प्रश्नही सर्वसामान्य जनतेला पडला आहे.