शिकाऊ डॉक्टरसह दोन जणांना मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांकडून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 07:42 PM2019-07-31T19:42:27+5:302019-07-31T19:45:04+5:30
चोरट्यांकडून सुमारे दहा लाखाच्या तब्बल १९ मोटारसायकली जप्त
औरंगाबाद: शहराच्या वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरणाऱ्या एका शिकाऊ डॉक्टरसह त्याच्या साथीदाराला सिडको पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने बुधवारी अटक केली. या चोरट्यांकडून सुमारे दहा लाखाच्या तब्बल १९ मोटारसायकली जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांनी दिली.
शिकाऊ डॉक्टर नाजीम बनेखॉ पठाण (वय २२,रा. नाचनवेल, ता. कन्नड) आणि विजय पुंडलिक दिवटे (वय २८,रा. रामनगर, मुकुंदवाडी)अशी अटेकतील चोरट्यांची नावे आहेत . पोलीस उपायुक्त डॉ. खाडे म्हणाले की, शहराच्या वेगवेगळ्या भागातून अलीकडच्या काळात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्याचे समोर आले. वाहन चोरी रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे आणि चोरट्यांचा शोध घेण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत. सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर कर्मचारी नरसिंग पवार, राजेश बनकर, प्रकाश डोंगरे, संजय सिरसाठ, स्वप्नील रत्नपारखी, सुरेश भिसे,, किशोर गाढे यांच्या पथकाने आरोपी नाजीम पठाण याला संशयावरून ताब्यात घेतले. तो जळगाव येथील एका कॉलेजमध्ये बी.एच.एम.एस.च्या पहिल्यावर्षात शिकत असल्याचे त्याने सांगितले.
चौकशीदरम्यान सुरवातीला तो उडवा,उडवीची उत्तरे देऊ लागला. पोलिसानी खाक्या दाखविताच त्याने जळगाव रस्त्यावरील एका रुग्णालयासमोरून पाच ते सहा दिवसापूर्वी मोटारसायकल साथीदार दिवटे च्या मदतीने चोरल्याची कबुली त्याने दिली. शिवाय अन्य वसाहतीतून चोरलेल्या मोटारसायकली ग्रामीण भागात विक्री केल्याचे तो म्हणाला. पोलिसांनी लगेच त् विजय दिवटेला उचलले. त्यांना समोरासमोर बसवून विचारपूस केल्यानंतर शहराच्या वेगवेगळ्या भागातून चोरलेल्या १९ मोटारसायकली कन्नड आणि सिल्लोड तालुक्यातील लोकांना विक्री केल्याचे सांगितले.पोलिसांनी रात्रीतून ही वाहने जप्त केली.