पाण्यासाठी महापालिका प्रशासकाच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 01:01 PM2021-05-26T13:01:04+5:302021-05-26T13:08:23+5:30
आमचे गाऱ्हाणे मांडण्यासाठी आम्ही प्रशासकांकडे आलोय, असे नागरिकांचे म्हणणे होते.
औरंगाबाद : हडको एन-१३ भागातील वानखेडेनगर, मुजफ्फरनगर या भागात काही दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नाही. पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने नागरिकांनी सोमवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास महापालिका प्रशासक यांच्या बंगल्यासमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.
मुजफ्फरनगरमध्ये नळाला आठ ते दहा दिवसांपासून पाणी आलेले नाही. पिण्यासाठी पाणी मिळत नाही. पाणी विकत घेण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात काम धंदे बंद असल्याने पैसे नाही, मनपाकडे तक्रार केली, तर आर्थिक परिस्थिती नाजूक असताना चार हजार रुपये पाणीपट्टी भरायला सांगत आहे. तक्रार तरी कोणाकडे करावी? असा प्रश्न आमेर चाऊस यांनी उपस्थित केला. आमचे गाऱ्हाणे मांडण्यासाठी आम्ही प्रशासकांकडे आलोय, असे नागरिकांचे म्हणणे होते. दरम्यान, पोलिसांनी पाच ते सहा नागरिकांना ताब्यात घेऊन सिटीचौक पोलीस ठाण्यात नेले. या संदर्भात पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण धांडे म्हणाले की, या भागाला एक तास पाणी देण्यात येते. परंतु कमी दाबाने पाणी येत असल्याची तक्रार होती. चौकशी करून कार्यवाही केली जाईल.