पाच हजारांची लाच घेताना पोलीस जमादार पकडला
By Admin | Published: September 30, 2014 01:20 AM2014-09-30T01:20:22+5:302014-09-30T01:31:28+5:30
औरंगाबाद : चॅप्टर केस न करण्यासाठी एक जणाकडून पाच हजारांची लाच घेताना वाळूज एमआयडीसी ठाण्याचा पोलीस जमादार ताराचंद धर्मू राठोड (रा. कोमलनगर, पडेगाव) याला
औरंगाबाद : चॅप्टर केस न करण्यासाठी एक जणाकडून पाच हजारांची लाच घेताना वाळूज एमआयडीसी ठाण्याचा पोलीस जमादार ताराचंद धर्मू राठोड (रा. कोमलनगर, पडेगाव) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रंगेहाथ अटक केली.
या कारवाईबाबत पोलिसांनी सांगितले की, एमआयडीसी परिसरातील कमळापूर फाटा येथील एका कुटुंबाविरुद्ध शेजाऱ्याने शिवीगाळ व मारहाणीची तक्रार वाळूज पोलीस ठाण्यात दिली होती. या तक्रारीचा तपास जमादार ताराचंद राठोड याच्याकडे सोपविण्यात आला होता. ‘या तक्रारीवरून तुझ्याविरुद्ध चॅप्टर केस करतो आणि तुमचे सगळे घर जेलमध्ये पाठवितो’ अशी जमादार राठोडने आरोपीला धमकी दिली. चॅप्टर केस टाळायची असेल तर मला दहा हजार रुपये आणून दे, असेही राठोडने बजावले. तडजोडीअंती पाच हजार रुपयांमध्ये सौदा ठरला. मात्र, पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गाठला आणि तक्रार केली.
त्यावरून सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने जमादार राठोडला संपर्क साधला. तेव्हा त्याने पाच हजार रुपये घेऊन वाळूज एमआयडीसी ठाण्यात येण्यास सांगितले. त्यानुसार लाचलुचपतच्या पोलिसांनी पोलीस ठाण्यासमोर सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदार पाच हजार रुपये घेऊन ठाण्यासमोर आले. जमादार राठोडने त्यांना ठाण्याच्या गेटजवळ नेले आणि तेथे पाच हजारांची लाच स्वीकारली. त्याक्षणी बाजूला दबा धरून बसलेल्या लाचलुचपतच्या पोलिसांनी झडप मारून जमादार राठोडला रंगेहाथ अटक केली.