तक्रारीवर कारवाई करण्यासाठी पाच हजार रुपये लाच मागणारा पोलीस चतुर्भूज
By राम शिनगारे | Published: November 24, 2022 07:34 PM2022-11-24T19:34:55+5:302022-11-24T19:35:14+5:30
पोलीस ठाण्याच्या परिसरातच स्विकारले पैसे
औरंगाबाद : बजाज फायनान्सकडून कर्ज घेऊन दुचाकी घेतली. ही कर्जफेड न झाल्यामुळे फायनान्स कंपनीने दुचाकी ओढून नेली. त्याचवेळी तक्रारदारास मारहाण करण्यात आली. या मारहाणीची तक्रार दुचाकी घेणाऱ्याने उस्मानपुरा पोलीस ठाण्यात केली होती. या तक्रारीवर कारवाई करण्यासाठी व दुचाकी परत मिळवून देण्यासाठी पाच हजार रुपये लाच मागणारा पोलीस कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून गुरुवारी दुपारी रंगेहाथ पकडल्याची माहिती उपअधिक्षक मारुती पंडित यांनी दिली.
प्रकाश धोडींबा सोनवणे असे लाच स्विकारणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. तक्रारदाराची दुचाकी बजाज फायनान्सच्या कर्मचाऱ्यांनी कर्जाचे हाप्ते थकल्यामुळे ओढुन नेली. दुचाकी घेऊन जाताना त्या कर्मचाऱ्यांनी दुचाकीमालकास मारहाण केली. या प्रकरणाची रितसर तक्रार उस्मानपुरा पोलीस ठाण्यात नोंदवली होती. या तक्रारीचा तपास प्रकाश सोनवणे याच्याकडे देण्यात आला होता. तपास करीत असताना दुचाकी परत मिळवुन देण्यासह मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी साेनवणे याने ५ हजार रुपयांची मागणी केली. सुरुवातीला तक्रारदाराने पाच हजार रुपये दिले. त्यानंतरही पाच हजार रुपयांची दुसऱ्यांदा मागणी केली. तेव्हा तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार नोंदवली.
या तक्रारीची शहनिशा केल्यानंतर सोनवणे याने लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलीस ठाण्याच्या परिसरातील चहाच्या टपरीवर पाच हजार रुपये स्विकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर अधीक्षक डॉ. विशाल खांबे, उपअधिक्षक मारुती पंडित यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक नंदकिशोर क्षीरसागर, हवालदार राजेंद्र जोशी, सुनील पाटील, अशोक नागरगोजे, विलास चव्हाण, चांगदेव बागुल यांच्या पथकाने केली.