कोर्टाच्या समन्ससाठी पोलिसाने मागितले दोन हजार, गुन्हा दाखल
By राम शिनगारे | Published: August 27, 2023 09:00 PM2023-08-27T21:00:09+5:302023-08-27T21:00:20+5:30
संशय आल्याने ऐन वेळी पैसे घेण्यास नकार
छत्रपती संभाजीनगर : न्यायालयाने काढलेले समन्स प्रतिवादीस बजावून त्याचा अहवाल न्यायालयात सादर करण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्याने दोन हजार रुपयांची लाच मागितली. त्यातील ५०० रुपये घेतल्यानंतर उर्वरित १५०० रुपये घेण्यासाठी कर्मचारी आला. मात्र, त्यास संशय आल्यामुळे त्याने लाच घेतली नाही. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यास ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात वाळूज एमआयडी पोलिस ठाण्यात लाच मागणीचा गुन्हा नोंदविल्याची माहिती अधीक्षक संदीप आटोळे यांनी दिली.
संतोष गिरजाराम वाघ (४४) असे लाच मागणाऱ्या वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्याचे नाव आहे. तक्रारदारास एकाने दोन धनादेश दिले होते. ते वटले नाहीत. त्यांनी न्यायालयात कलम १३८ नुसार दावा दाखल केला. न्यायालयाने प्रतिवादीला समन्स काढले. हे समन्स बजावण्याची जबाबदारी पोलिस अंमलदार वाघवर होती. त्याने दावा दाखल करणाऱ्यालाच २ हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यांनी ५०० रुपये वाघला दिले, असे फिर्यादीत म्हटले आहे. रविवारी वाघने उर्वरित दीड हजार रुपये लाचेची मागणी केली. तत्पूर्वी या प्रकरणी एसीबीकडे तक्रार करण्यात आली होती. त्यांनी पडताळणी केली. त्यात दीड हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. ‘एसीबी’चे पोलिस निरीक्षक संतोष घोडके यांनी सापळा लावला. मात्र, वाघला संशय आल्यामुळे त्याने रक्कम घेतली नाही. त्यानंतर एसीबीच्या पथकाने वाघला ताब्यात घेऊन गुन्हा नोंदविला. ही कारवाई एसीबीचे अंमलदार रवींद्र काळे, विलास चव्हाण, चांगदेव बागूल यांनी केली.
लष्करी सेवेतून पोलिस दलात
आरोपी पोलिस कर्मचारी संतोष वाघ हा लष्करी सेवा संपल्यानंतर महाराष्ट्र पोलिस दलात रुजू झाला होता. त्यास लाचेची मागणी केल्यामुळे पकडण्यात आले. त्यामुळे शहर पोलिसांत खळबळ उडाली आहे.