नशेच्या गोळ्या विकणाऱ्यांसाठी पोलीस बनले 'मुन्नाभाई एबीबीएस'; अट्टल गुन्हेगार ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 08:01 PM2022-08-22T20:01:39+5:302022-08-22T20:02:15+5:30
एनडीपीएस पथकाची कारवाई : नशेच्या गोळ्या अवैधपणे विकताना जेरबंद
औरंगाबाद : घाटी परिसरात नशेखोरांना गुंगीकारक गोळ्या विकण्यासाठी आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला एनडीपीएसच्या पथकातील दोन पोलिसांनी डॉक्टर बनून पकडले. आरोपीकडे नशेच्या अवैध गोळ्या सापडल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली.
एनडीपीएस पथकाचे सहायक निरीक्षक हरेश्वर घुगे यांच्या पथकास रेकॉर्डवरील गुन्हेगार शेख नय्यर शेख नईम हा शेख रहीम शेख महेबूब (दोघे रा. आसिफा कॉलनी, टॉऊन हॉल) याच्यासह नशेच्या गोळ्या विक्रीसाठी घाटी रुग्णालयातील मशिदीच्या जवळ येणार असल्याची माहिती मिळाली. या परिसरात डॉक्टरांसह इतरांची गर्दी असते. त्यामुळे आरोपीला संशय येऊ नये म्हणून अंमलदार महेश उगले, सुरेश भिसे यांनी निवासी डॉक्टरांना विनंती करीत त्यांच्याकडून ॲप्रन, स्टेथोस्कोप घेत परिधान केले. हातात डायरी घेऊन त्या ठिकाणी दोन्ही पोलीस चर्चा करीत होते. त्याचवेळी सपोनि घुगे यांच्यासह इतर कर्मचारी मोबाईलवर कॉन्फरन्स कॉलच्या माध्यमातून एकमेकांना माहिती, सूचना देत होते.
आरोपी हा पोलिसांवर हल्ला करू शकतो, ही शक्यता गृहीत धरूनच सापळा लावला होता. शेख नय्यर येत असल्याची माहिती समजताच उगले, भिसे यांनी चालत्या दुचाकीवर झडप मारून दोघांना पकडले. तोपर्यंत आजूबाजूच्या पथकातील सदस्यांनीही धाव घेतली. आरोपींची झडती घेतली असता, त्याच्याकडे नशेच्या गोळ्या सापडल्या. तसेच मागील वेळी शेख नय्यरने गोळ्यांचा साठा बहिणीकडे ठेवला होता. त्यामुळे त्याच्या बहिणीसह त्याच्या घराची झडती घेतली. मात्र, गोळ्या आढळल्या नाहीत. या दोघांच्या विरोधात बेगमपुरा ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई निरीक्षक आघाव यांच्या मार्गदर्शनात सपोनि घुगे, सहायक उपनिरीक्षक नसीम खान, अंमलदार विशाल सोनवणे, महेश उगले, धर्मराज गायकवाड, सुरेश भिसे, प्राजक्ता वाघमारे आणि दत्ता दुभळकर यांच्या पथकाने केली.
आरोपींना पोलीस कोठडी
तपास अधिकारी उपनिरीक्षक विशाल बोडखे यांनी दोन्ही आरोपींना जिल्हा न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. मुख्य आरोपी शेख नय्यर याचे आठ दिवसांनंतर लग्न होते. त्यामुळे पोलिसांनी पकडल्यानंतर तो लग्नासाठी सोडण्याची मागणी पोलिसांकडे सतत करीत होता.