लिंबेजळगावच्या पोलीस पाटलांच्याच घरी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:04 AM2021-02-25T04:04:31+5:302021-02-25T04:04:31+5:30
लिंबेजळगांव : येथील पोलीस पाटलांच्या घरातच अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. सोन्याच्या दागिन्यांसह एक ...
लिंबेजळगांव : येथील पोलीस पाटलांच्या घरातच अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. सोन्याच्या दागिन्यांसह एक मोबाइल चोरी गेल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात पोलीस पाटील बाबासाहेब रामनाथ पडघन यांनी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, लिंबेजळगांवचे पोलीस पाटील बाबासाहेब पडघन हे रात्री जेवण करून झोपले. त्यांच्या घराचा मागील दरवाजा नजरचुकीने उघडाच राहीला. दरम्यान, मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी संधीचा फायदा घेऊन घरातील बारा हजार किमतीचे एक सोन्याचे झुंबर, सहा हजार रुपये किमतीचे दोन ग्रॅमचे मणीमंगळसूत्र व दहा हजार किमतीचा एक मोबाइल असा २८ हजार किमतीचा ऐवज लंपास केला. सकाळी सहा वाजता घरातील लोक उठल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक लक्ष्मण उंबरे करीत आहे.
----------
लिंबेजळगांव हे ओद्योगिक वसाहतीजवळचे गाव आहे. येथे विविध राज्यांतील कामगार भाडेकरू म्हणून राहतात. विशेष म्हणजे, मागील काही दिवसांपासून गावात चोरीच्या घटना सुरूच आहे. त्यामुळे पोलिसांनी भाडेकरूंची सर्व माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन केले आहे, तर वाढत्या चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.