वाईन शॉपवर बनावट नोटा चलनात आणणारा पकडला, तपासानंतर पोलिसांनी टोळीच केली उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2021 04:34 PM2021-12-29T16:34:50+5:302021-12-29T16:35:45+5:30
उच्च शिक्षित तरुणाने किरायाने रूम घेत सुरु केला बनावट नोटा छापण्याचा कारखाना
औरंगाबाद : बनावट नोटा चलनात आणण्यासाठी वाईन शॉपवर आलेल्या एकाच्या पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान मुसक्या आवळल्या. याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून ५००, १०० आणि ५० रुपयांच्या तब्बल १ लाख २० हजाराचे बनावट चलन जप्त करण्यात आले आहे.
शहरात बनावट नोटा चलनात येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना सोमवारी खबऱ्या मार्फत मिळाली होती. यावरून मंगळवारी सायंकाळी पुंडलिकनगर रोडवरील एका वाईन शॉपवर पोलिसांनी सापळा रचला. यावेळी रघुनाथ ढवळपुरे यास पोलिसांनी बनावट नोटांसह ताब्यात घेतले. पोलीस चौकशीत समरान उर्फ लक्की रशीद शेख ( ३०, जसवंत नगर ) हा बनावट नोटा छापत असल्याचे उघडकीस आले. लक्की उच्च शिक्षित असून पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. नितीन चौधरी ( २५, मुकुंदवाडी ) याच्या मदतीने मुकुंदवाडी येथे रूम किरायाने घेऊन लक्कीने बनावट नोटा छापने सुरु केले होते. अक्षय आण्णासाहेब पडूळ ( २८, गजाजन नगर ) व दादाराव पोपटराव गावंडे ( ४२ , गजानन नगर ) यांच्या मार्फत बनावट नोटा बाजारात चलनात येत असत.
दरम्यान, पोलिसांनी मुकुंदवाडी येथील बनावट नोटांच्या कारखान्यावर छापा टाकला. येथून ऑलइनवन प्रिंटर , कटर, कागद, कार जप्त केले. पोलिसांनी लक्कीसह इतर तिघांना ताब्यात घेतले आहे. आरोपींकडे १ लाख २० हजार रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या. ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, पोलीस उपआयुक्त दीपक गीऱ्हे, सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल ढूमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षण दिलीप गांगुर्डे, सपोनी शेषराव खटाने, सफौ रमेश सांगळे, बाळाराम तौर, गणेश डोईफोडे, गणेश वैराळकर, जालिंदर मांटे, दीपक जाधव, राजेश यदमळ, कल्याण निकम, प्रवीण मुळे, कोमल तारे, प्रशांत भगरे यांनी केली.