अवैध दारू विक्रेत्यांच्या विरोधात धडक मोहिम: एकाच दिवसात १४ गुन्हे दाखल
By राम शिनगारे | Published: March 6, 2023 06:31 PM2023-03-06T18:31:16+5:302023-03-06T18:35:23+5:30
टाऊन हॉल परिसरात सिटीचौक पोलिसांनी एक महिला अवैध दारू विकताना पकडली.
छत्रपती संभाजीनगर: होळी, धळवडीच्या सणाच्या निमित्ताने शहर पोलिसांनी अवैध दारू विक्रीच्या विरोधात रविवारी दिवसभर धडक मोहिम उघडत गुन्हे नोंदवले आहे. शहरातील विविध पोलिस ठाण्यात १४ ठिकाणी जणांवर ही कारवाई करण्यात आली.
उस्मानपुरा पोलिसांनी कलीम उर्फ कल्ल्या खान शब्बीर खान पठाण (रा. अण्णाभाऊ साठे चौक, छोटा मुरलीधरनगर, उस्मानपुरा) याच्या घरात गावठी हातभट्टी तयार करून १०० रूपये लिटर प्रमाणे विक्री केली जात होती. त्याठिकाणी पोलिसांनी छापा मारून सर्व गावठी हातभट्टी जप्त केली. मुकुंदवाडीतील एका मोकळ्या मैदानात भरत बाबुराव वनारसे (रा. रेल्वे गेट ५६, मुकुंदनगर), स्मशानभूमीच्या बाजूला सोमीनाथ अर्जुन पिंपळे (रा. मुकुंदवाडी) या दोघांना मुकुंदवाडी पोलिसांनी हे अवैध दारू विकताना पकडले.
टाऊन हॉल परिसरात सिटीचौक पोलिसांनी एक महिला अवैध दारू विकताना पकडली. क्रांतीचौक पोलिसांनी मिलकॉर्नर परिसरात प्रतिक किसनलाल जैस्वाल (रा. छावणी) याच्याकडे १४०० रुपयांची अवैध दारू आढळून आली. रेल्वेस्टेशन परिसात वेदांतनगर पोलिसांनी सचिन नारायण रमंडवाल (रा. मोची मोहल्ला, पदमपुरा) यास दारू विकताना ताब्यात घेतले. सिडको पोलिसांनी जळगाव रोडवर शाम विजय चौधरी (रा. पिसादेवी) याच्याकडे २१०० रुपयांची, टीव्ही सेंटर परिसरात योगेश मुकूंद काकडे (रा. सिद्धार्थनगर, एन १२, हडको), मारुती टायर्स कंपनीसमोर राजु धनाजी घोरपडे (रा. फुलेनगर, आंबेडकरनगर), एमएसईबीच्या डीपीजवळ स्वप्नील शिवाजी पाटील (रा. हर्सुल), अंबिका इंजिनिअरींग समोर विशाल कडुबा खिल्लारे (रा. मिसारवाडी) यांना अवैध दारू विक्री करताना पकडले. बेगमपुरा पोलिसांनी देविदास श्यामराव पवार (रा. पडेगाव) यास फौजी धाब्याच्या मागील बाजूस दारू विकताना पकडले. एमआयडीसी वाळूज पोलिसांनी शाम मुरलीधर सांळुके, नवनाथ आत्माराम साळुंके यास अवैध दारू विकताना रंगेहाथ पकडले.