पोलिसांचा भर पावसात पाठलाग; गावठी पिस्टलचा धाक दाखवणाऱ्या अट्टल गुन्हेगारास बेड्या

By राम शिनगारे | Published: September 25, 2023 06:13 PM2023-09-25T18:13:46+5:302023-09-25T18:14:10+5:30

कुख्यात गुन्हेगार टिप्प्याचा भाऊ गुड्डु उर्फ मॅक्सला अटक

Police chase in rain; Shackles to the adamant criminals who fear village pistols | पोलिसांचा भर पावसात पाठलाग; गावठी पिस्टलचा धाक दाखवणाऱ्या अट्टल गुन्हेगारास बेड्या

पोलिसांचा भर पावसात पाठलाग; गावठी पिस्टलचा धाक दाखवणाऱ्या अट्टल गुन्हेगारास बेड्या

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : कुख्यात गुन्हेगार असलेल्या मोठ्या भावाच्या पावलावर पाऊल ठेवत लहान भावानेही शनिवारी रात्री वेगवेगळे बार, देशी दारूच्या दुकानावर जाऊन गावठी पिस्टलच्या साहाय्याने दहशत निर्माण केली. ही माहिती मिळताच पुंडलिकनगर पोलिसांनी मुसळधार पावसात अट्टल गुन्हेगाराचा तीन पास पाठलाग केला. गुन्हेगार सतत गुंगारा देत फिरत होता. शेवटी त्यास पकडण्यात यश मिळाले. त्याच्याकडून गावठी पिस्टलसह जिवंत काडतूस जप्त केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजश्री आडे यांनी दिली.

गुड्डु उर्फ मॅक्स उर्फ शेख जुबेर शेख मकसूद (३७, रा. विजयनगर) असे गावठी कट्ट्यासह पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. पुंडलिकनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुड्डु उर्फ मॅक्स हा घातपात करण्याच्या उद्देशाने स्वत:जवळ पिस्टल बाळगून परिसरात दहशत निर्माण करीत असल्याची माहिती निरीक्षक आडे यांना समजली. तेव्हा त्यांनी उपनिरीक्षक आनंद बनसोडे, संदीप काळे यांच्या पथकास आरोपीचा शोध घेण्यास पाठविले. मात्र, अट्टल आरोपी पोलिसांनी हुलकावणी देत होता. तेव्हा निरीक्षक आडे यांच्यासह सहायक निरीक्षक शेषराव खटाणे यांनीही आरोपीचा शोध सुरू केला. मुसळधार पावसात आरोपी सतत हुलकावणी देत होता. पोलिस त्याचा पाठलाग करीत होते. शेवटी आरोपी घरी पोहोचल्याचे समजताच पोलिसांच्या पथकाने घरावर छापा मारला. तेथे पाेलिसांनी गुड्डुच्या मुसक्या आवळल्या.

त्याच्याकडे देशी बनावटीचे गावठी पिस्टल, एक जिवंत काडतुसासह बुलेट, मोबाइल आढळले. पोलिस नाईक जालिंदर मान्टे यांच्या तक्रारीवरून त्याच्याविरुद्ध बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई निरीक्षक राजश्री आडे, सपोनि खटाणे, उपनिरीक्षक बनसोडे, काळे, सहायक फाैजदार व्ही. व्ही. मुंढे, नाईक गणेश डोईफोडे, दीपक देशमुख, कल्याण निकम, संदीप बिडकर, प्रशांत नरवडे आदींनी केली.

...तर मोठा अनर्थ घडला असता
सध्या सर्वत्र गणेशोत्सव सुरू आहे. त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात लावण्यात आला आहे. त्यातच आरोपी गुड्डु हा गावठी पिस्टल घेऊन वेगवेगळ्या बिअरबार, देशी दारूच्या दुकानांवर जाऊन दहशत निर्माण करीत होता. ऐन गणेशोत्सवात पोलिसांच्या खबरदारीमुळे मोठा अनर्थ टळला आहे. दरम्यान, आरोपीचा मोठा भाऊ कुख्यात गुंड टिप्प्या सध्या दोन गुन्ह्यात फरार आहे.

Web Title: Police chase in rain; Shackles to the adamant criminals who fear village pistols

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.