पोलीस आयुक्तालय इमारतीच्या कामाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन
By Admin | Published: February 27, 2017 07:03 PM2017-02-27T19:03:51+5:302017-02-27T19:03:51+5:30
पोलीस आयुक्तालयाच्या नवीन इमारतीसह, पोलीस कर्मचा-यांचे निवासस्थानांसाठी शासनाकडून तब्बल २०० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.
>ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 27 - पोलीस आयुक्तालयाच्या नवीन इमारतीसह, पोलीस कर्मचा-यांचे निवासस्थानांसाठी शासनाकडून तब्बल २०० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या कामाचे भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा सभापती हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते २ मार्च रोजी करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकारांना दिली.
आयुक्त म्हणाले की, शासनाने पोलीस आयुक्त कार्यालयाच्या तीन मजली इमारतीसह, पोलीस आयुक्त, ४ पोलीस उपायुक्त, ८ सहायक पोलीस आयुक्त यांच्या निवासस्थानासाठी २० कोटी रुपये दिले. पोलीस आयुक्त कार्यालयाच्या मागे असलेल्या पोलीस कॉलनी निकृष्ट झाल्याने ही कॉलनी पाडून तेथे ५३२ पोलिसांची निवासस्थाने उभारण्यात येत आहे. या पोलीस कॉलनीसाठी १४०कोटी रुपये प्राप्त झालेले आहेत. या कामाचे भूमीपूजन राज्य पोलीस क्रिडा स्पर्धेच्या प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केले जाणार होते. परंतु शिक्षक मतदार संघाची आचारसंहिता सुरू असल्याने त्यावेळी हे भूमीपूजन झाले नव्हते. २ मार्च रोजी हा भूमीपूजन समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे. याशिवाय पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिका-यांसाठी शासनाने म्हाडाकडून तीसगाव येथील प्रकल्पातील ६५ निवासस्थाने खरेदी केली आहेत. यासाठी मोठा खर्च शासनाने केला. या घरांच्या चाव्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलीस अधिका-यांना मिळतील. यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री सुभाष भामरे, राज्याचे गृहराज्यमंत्री दिपक केसरकर, राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर उपस्थित राहणार आहेत. शासनाने २०० कोटी रुपये पोलीस आयुक्त कार्यालयास दिले आहे. २५ वर्षात या आयुक्तालयाच्या इमारतीचे बांधाकम झाले नव्हते. एवढेच नव्हे तर क्रांती चौक पोलीस कॉलनीचीही अवस्था दयनीय झाल्याने तेथे पोलीस कर्मचा-यांसाठी ४५० निवासस्थाने बांधण्यात येणार आहे. क्रांतीचौक पोलीस कॉलनीसाठी १५० कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. याशिवाय तिस-या टप्प्यांतर्गत परेड ग्राऊंड, पोलीस भरती होणारे नवीन मुले आणि मुली यांच्यासाठी स्वतंत्र वसतिगृह, सभागृहाचा प्रकल््प आहे. या प्रकल्पासाठी आणखी १०० कोटी रुपयांचा निधी लागणार आहे.हा प्रस्तावही शासनास लवकरच सादर होईल.