...अन् पोलीस आयुक्त धडकले थेट रावरसपुऱ्यातील देशी दारू दुकानात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:05 AM2021-02-11T04:05:46+5:302021-02-11T04:05:46+5:30
औरंगाबाद: रावरसपुऱ्यातील सरकारमान्य देशी दारू दुकानाचा परवाना तिसगावचा आहे, मात्र हे दुकान बेकायदेशीरपणे रावरसपुऱ्यात चालविण्यात येत आहे. या ...
औरंगाबाद: रावरसपुऱ्यातील सरकारमान्य देशी दारू दुकानाचा परवाना तिसगावचा आहे, मात्र हे दुकान बेकायदेशीरपणे रावरसपुऱ्यात चालविण्यात येत आहे. या दुकानावर कारवाई करा, अशी मागणी एका नागरिकाने करताच पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता हे अन्य अधिकाऱ्यांना सोबत घेऊन थेट रावरसपुऱ्यातील देशी दारू दुकानात गेले. त्यांनी दुकान कुणाच्या नावाने आहे, याची विचारणा करून लायसन्सची पडताळणी करण्याचे आदेश गुन्हे शाखेला दिले.
छावणी पोलीस ठाण्यात बुधवारी दुपारी नागरिक पोलीस स्नेहमिलन पार पडले. तेथे येण्यास तासभर उशीर झाल्यामुळे आयुक्तांनी नागरिकांची माफी मागून समस्या जाणून घेण्यास सुरुवात केली. यावेळी एका नागरिकाने, रावरसपुऱ्यातील देशी दारू दुकानाचा परवाना तिसगावचा आहे. मात्र, ते विनापरवाना चालविले जात असल्याची तक्रार केली. आयुक्तांनी त्यांना आपण दुकानात जाऊन परवाना चेक करू असे सांगितले. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, पोलीस निरीक्षकासह दारू दुकान गाठले. दुकानातील नोकर रवीला आयुक्तांनी अनेक प्रश्न विचारले. त्यांच्यासमोर उपायुक्तांनी लायसन्स तपासून, पडताळणी करण्याचे काम गुन्हे शाखेकडे सोपविले.
===========
पडेगाव रस्त्यावर गतिरोधक टाका, पोलीस चौकी सुरू करा
पडेगाव हा अत्यंत वर्दळीचा रस्ता आहे. कासंबरी दर्गा येथे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक वास्तव्यास असतात. यामुळे पडेगाव येथे तातडीने पोलीस चौकी सुरू करण्याची विनंती एका नागरिकाने केली. शिवाय मुख्य रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी तीन ठिकाणी गतिरोधक बसविण्याची विनंती केली.
===========
भीमनगर भावसिंगपुऱ्यात टवाळखोरांचा धुमाकूळ
भीमनगर येथे पोलीस चौकी आहे. मात्र, तेथे पोलीस नसतात. यामुळे टवाळखोरांचा रात्रंदिवस धुमाकूळ सुरू असतो. त्यांच्यावर पोलिसांचे नियंत्रण नसल्याची तक्रार एका वकिलाने केली. याच परिसरात आठ दिवसांपूर्वी खून झाल्याचे त्यांनी नमूद केले.
================
छावणी ठाण्यात नागरिकांना अपमानास्पद वागणूक
छावणीचे पोलीस निरीक्षक मनोज पगारे हे नागरिकांना अपमानास्पद वागणूक देतात, तक्रार घेत नाहीत, नागरिकांना हाकलून देतात. यामुळे ठाण्याबाहेर उभे राहावे लागते, अशा अनेक तक्रारी ऐकून आयुक्तांनी यापुढे तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. तुमची तक्रार मला थेट सांगा, असा शब्द दिला.