पोलीस आयुक्तांची कार रोखणाऱ्यास ६ महिने कारावास
By Admin | Published: September 30, 2014 01:11 AM2014-09-30T01:11:19+5:302014-09-30T01:30:40+5:30
औरंगाबाद : गस्तीवर असलेल्या पोलीस आयुक्तांची कार अडवून हुज्जत घालणाऱ्या तरुणाला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. शेख यांनी सहा महिने कारावासाची शिक्षा ठोठावली.
औरंगाबाद : गस्तीवर असलेल्या पोलीस आयुक्तांची कार अडवून हुज्जत घालणाऱ्या तरुणाला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. शेख यांनी सहा महिने कारावासाची शिक्षा ठोठावली.
अमोल भावराव खरात (३०,रा. किलेअर्क) अशी शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. औरंगाबाद शहराचे पोलीस आयुक्त २६ फेब्रुवारी २०१४ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास गस्तीवर होते. ते शासकीय कारने (क्रमांक एमएच-२० एएस-७६७६) किलेअर्कमधून जात असताना अमोल हा अचानक त्यांच्या कारसमोर आडवा झाला. यावेळी त्याने त्यांच्या कारच्या खिडकीवर जोराने मारून काच फोडली आणि तो आरडाओरड करू लागला. यावेळी पोलीस आयुक्तांसोबत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यास पकडले आणि सिटीचौक पोलिसांच्या ताब्यात दिले.
याप्रकरणी पोलीस कर्मचारी उद्धव किसन गीते यांनी दिलेल्या तक्रारीवरून सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, मालमत्ता विद्रुपीकरण कायद्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोेलिसांनी तपास करून आरोपीच्या विरोेधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याची सुनावणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. शेख यांच्यासमोर झाली असता सहायक सरकारी वकील अॅड. शोभा विजयसेनानी यांनी ३ साक्षीदार तपासले. उभय पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला मालमत्ता विद्रुपीकरण केल्याच्या आरोपाखाली सहा महिने कारावास, भादंवि १८६ कलमाखाली ३ महिने कारावास आणि कलम ३४१ नुसार १ महिना साधी कैद, अशी शिक्षा ठोठावली.