औरंगाबादमध्ये स्वच्छतागृहातील अधिकच्या वसुलीची चक्क पोलिसांत तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 04:01 PM2018-01-13T16:01:38+5:302018-01-13T16:02:14+5:30
मध्यवर्ती बसस्थानकातील स्वच्छतागृहात प्रवाशांकडून अधिक पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर आल्या आहेत; परंतु या तक्रारी केवळ बसस्थानकापुरत्याच मर्यादित राहिल्या. त्यामुळे प्रवाशांकडून अधिक पैसे उकाळण्याचा प्रकार सुरूच राहिला. मात्र, गेल्या अनेक वर्षांत प्रथमच एका प्रवाशाने थेट पोलिसांत तक्रार देऊन या प्रकाराला वाचा फोडल्याचे समोर आले आहे.
औरंगाबाद : मध्यवर्ती बसस्थानकातील स्वच्छतागृहात प्रवाशांकडून अधिक पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर आल्या आहेत; परंतु या तक्रारी केवळ बसस्थानकापुरत्याच मर्यादित राहिल्या. त्यामुळे प्रवाशांकडून अधिक पैसे उकाळण्याचा प्रकार सुरूच राहिला. मात्र, गेल्या अनेक वर्षांत प्रथमच एका प्रवाशाने थेट पोलिसांत तक्रार देऊन या प्रकाराला वाचा फोडल्याचे समोर आले आहे.
बानेवाडी (ता. बार्शी) येथील रहिवासी विठ्ठल लोखंडे यांनी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात मध्यवर्ती बसस्थानकातील स्वच्छतागृहात अधिक पैसे मागितल्याची तक्रार एका अर्जाद्वारे केली आहे. ते ७ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता मध्यवर्ती बसस्थानकातील स्वच्छतागृहात आंघोळीसाठी गेले. स्वच्छतागृहातील फलकावर आंघोळीसाठी ३, तर स्वच्छतागृहासाठी २ रुपये शुल्क लिहिलेले आहे; परंतु या ठिकाणी त्यांना २० रुपये मागण्यात आले. त्यामुळे जास्तीचे पैसे का मागता, अशी विचारणा त्यांनी स्वच्छतागृहातील कर्मचार्यास केली; परंतु त्यांना शिवीगाळ करण्यात आली. या ठिकाणी पुन्हा आल्यास मारहाण केली जाईल, अशी धमकीही दिली.
या प्रकारानंतर विठ्ठल लोखंडे यांनी सरळ क्रांतीचौक पोलीस ठाणे गाठून अर्जाद्वारे स्वच्छतागृहात घडलेल्या प्रकाराची तक्रार दिली. संबंधितावर कारवाई करण्याची मागणी त्यांंनी केली आहे. बसस्थानकातील स्वच्छतागृहात महिलांसाठी पैसे आकारण्यात येऊ नये, असा नियम आहे; परंतु या ठिकाणी महिलांना पैसे आकारल्याच्या अनेकदा तक्रारी आल्या आहेत. या ठिकाणी फलक लावण्यात आले आहेत; पण तरीही सर्वसामान्य प्रवाशांची अडवणूक केली जाते. विशेषत: सकाळी आणि रात्रीच्या वेळी हा प्रकार अधिक होतो. अनेक प्रवासी विशेषत: ग्रामीण भागातील प्रवासी मागेल तेवढे पैसे देऊन मोकळे होतात, तर अनेक जण घाईगडबडीमुळे तक्रार करण्याचे टाळतात. त्यामुळे हा प्रकार सुरूच असल्याचे दिसते; परंतु गेल्या महिन्यांत पहिल्यांदाच यासंदर्भात पोलिसांत तक्रार पोहोचली आहे. या प्रकरणी पोलीस नाईक शिवाजी वाडेकर तपास करीत आहेत.
दर महिन्याला ४ हजारांचा दंड
स्वच्छतेसह अधिक रक्कम उकाळल्यासंदर्भात प्रवाशांकडून आगार व्यवस्थापकांकडे दर महिन्याला ६ ते ८ तक्रारी येत असल्याची माहिती समोर आली आहे. या तक्रारीपोटी स्वच्छतागृहात ५०० ते एक हजार रुपयांपर्यंतचा दंड लावला जातो; परंतु तरीही सुधारणा होत नसल्याने प्रवाशांची आर्थिक लूट सुरू असल्याचे दिसते. आगार व्यवस्थापक स्वप्नील धनाड म्हणाले, अधिक पैसे घेत असल्याच्या तक्रारी येतात. त्यामुळे यासंदर्भात स्वच्छतागृहाच्या सुपरवायझरला सक्त सूचना करण्यात आली आहे.
स्टेशनवरील स्वच्छतागृहाची ट्विटरवर तक्रार
औरंगाबादच्या मॉडेल रेल्वेस्टेशनवर स्वच्छतागृहात लघुशंकेसाठी प्रवाशांकडून एक रुपया वसूल केला जात आहे. लघुशंकेसाठी पैशाची होणारी आकारणी पाहून आश्चर्यचकित होत आहे. १ जानेवारी रोजी संजीव दास यांनी टिष्ट्वटरवरून रेल्वेस्टेशनवरील स्वच्छतागृहाची रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केली आहे. स्वच्छतागृह, स्नान, लघुशंकेसाठी होणार्या दर आकारणीसह येथील कर्मचारी मद्यपान करून असतात. तसेच प्रवाशांबरोबर खालच्या स्तरावर बोलत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.