पोलिस बंदोबस्तात डोंगरगावचे पाणी लातूरला
By Admin | Published: March 10, 2016 12:34 AM2016-03-10T00:34:24+5:302016-03-10T00:49:19+5:30
लातूर : डोंगरगाव उच्च पातळी बंधाऱ्यातील पाणी लातूरला देण्यास तीव्र विरोध असल्यामुळे बुधवारी जिल्हा प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात टँकरद्वारे लातूरला पाणी आणले.
लातूर : डोंगरगाव उच्च पातळी बंधाऱ्यातील पाणी लातूरला देण्यास तीव्र विरोध असल्यामुळे बुधवारी जिल्हा प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात टँकरद्वारे लातूरला पाणी आणले. २५ हजार लिटर्स टँकरच्या २५ ट्रीप करण्यात आल्या. दरम्यान, बेलकुंड येथून १०० आणि भंडारवाडी प्रकल्पातून ३५० ट्रीप करण्यात आल्या आहेत. सध्या लातूर शहरात ३९ लाख लिटर्स पाणी संकलित करण्यात आले आहे.
डोंगरगाव येथील उच्च पातळी बंधाऱ्यातून पाणी घेण्यास गावकऱ्यांनी विरोध केला होता. मात्र मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना समजावून सांगितले होते. पण गावकऱ्यांनी विरोध कायम ठेवला. दरम्यान, बुधवारी पोलिस बंदोबस्तात डोंगरगाव उच्चपातळी बंधाऱ्यातून प्रती २५ हजार लिटर्सच्या टँकरच्या २५ ट्रीप आणण्यात आल्या. शिवाय, बेलकुंड येथून प्रती २५ हजार लिटर्सच्या १०० ट्रीप करण्यात आल्या असून, भंडारवाडी प्रकल्पातूनही साडेतीनशे ट्रीप करण्यात आल्या आहेत. जवळपास ३९ लाख लिटर्स पाणी लातूर शहरातील टाक्यांमध्ये संकलित करण्यात आले आहे. पुढील दोन दिवसांत छोट्या टँकरद्वारे शहरात या पाण्याचे वितरण केले जाणार आहे.
गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून निलंगा तालुक्यातील डोंगरगाव उच्च पातळी बंधाऱ्यातून लातूरला पाणी आणण्याच्या हालचाली सुरू होत्या. पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन टँकरद्वारे लातूरला पाणी पुरविण्याचे प्रयत्न महापौर, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त यांनी डोंगरगाव येथील ग्रामस्थांशी चर्चा करुन प्रयत्न सुरू होते. तर डोंगरगाव ग्रामस्थ मात्र डोंगरगाव येथील उच्च पातळी बंधाऱ्यातील पाणी लातूरला घेऊन जाऊ देणार नाही, या भूमिकेवर ठाम राहिल्याने बैठकांवर बैठका घेऊनही काहीच उपयोग झाला नाही. परिणामी, बुधवारी जिल्हा प्रशासनाने बंधाऱ्यावरती मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त लावून डोंगरगाव उच्च पातळी बंधाऱ्यातील पाणी लातूरला घेऊन जाण्यास सुरुवात केली आहे.
यावेळी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, निलंग्याचे उपविभागीय अधिकारी भगवान आगे-पाटील, तहसीलदार विपीन पाटील, यु.एस. शृंगारे आदी प्रशासनातील अधिकारी डोंगरगाव उच्च पातळी बंधाऱ्यावर ठाण मांडून होते. यावेळी जवळपास शंभर पोलिस तैनात करण्यात आले होते. त्याचबरोबर अश्रुधुराच्या नळकांड्या घेऊन पोलिस कर्मचारी सज्ज असल्याचे दिसून आले. यावेळी डोंगरगाव उच्च पातळी बंधाऱ्यास छावणीचे स्वरुप आले असल्याचे दिसून येत होते.