पोलीस कॉन्स्टेबलने विषारी धुरातून रांगत जाऊन कुटुंबाला वाचविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 06:32 PM2020-02-28T18:32:19+5:302020-02-28T18:35:35+5:30
घरातून विषारी धुराचे लोळ बाहेर येत असल्याने आतमध्ये काहीच दिसत नव्हते.
औरंगाबाद : आग लागलेल्या बंगल्यात कुटुंब अडकल्याचे कळताच जवाहरनगर पोलीस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल सय्यद फईम आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी तोंडाला रुमाल बांधून अक्षरश: रांगत जाऊन जाधव कुटुंबाला वेळीच बाहेर काढल्याने तिघांचे प्राण वाचविण्यात यश आले.
माहिती कळताच जवाहरनगर ठाण्याच्या सहायक निरीक्षक श्रद्धा वायदंडे, पोलीस कर्मचारी सय्यद फईम, रवींद्र गायकवाड, नाईक, वाघचौरे हे अवघ्या ३ मिनिटांत घटनास्थळी पोहोचले. याच वेळी अग्निशामक दलाची गाडीही दाखल झाली. शिडी लावून अग्निशामक दलाचे जवान आणि पोलीस हेडकॉन्स्टेबल सय्यद फईम गॅलरीत चढले. दारासह खिडक्यांच्या काचा हातोड्याने फोडून त्यांनी आत प्रवेश केला. घरातून विषारी धुराचे लोळ बाहेर येत असल्याने आतमध्ये काहीच दिसत नव्हते.
सय्यद फईम आणि अन्य जवानाने तोंडाला रुमाल बांधला आणि जीव धोक्यात घालून रांगत रांगत जाऊन जाधव यांची बेडरूम गाठली. तेव्हा बेडवर सविता जाधव तर श्यामसुंदर जमिनीवर, त्यांची मुलगी आणि दहा वर्षांचा मुलगा बेशुद्ध पडलेले होते. मोबाईल बॅटरीच्या प्रकाशात त्यांनी प्रथम श्यामसुंदर यांना बाहेर काढले. त्यानंतर संस्कार, संस्कृती आणि सविता यांना खांद्यावर टाकून शिडीवरून खाली आणले आणि रुग्णालयात हलविले.
सविता जाधव यांनी आरडाओरड केल्याने शेजारी धावलेसविता जाधव यांनी मदतीसाठी आरडाओरड केल्याने शेजारी प्रदीप पाटील कुटुंबाने झटपट अग्निशामक दल, नगरसेवक आणि अन्य शेजाऱ्यांना बोलावून घेतले. पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांनी आग विझविण्यासाठी अग्निशमन यंत्रे आणली. दंडवते कुटुंबाच्या वॉचमनने नळीने आगीवर पाणी मारले. पारस पाटोदी यांनी वीजपुरवठा बंद केला.
लिथेनियम बॅटरी ठरल्या धोकादायक
घटनास्थळी सोलार दिव्यांसाठी लागणाऱ्या लिथेनियमच्या आठ बॅटऱ्या होत्या. या बॅटऱ्यांचा आगीमुळे स्फोट झाला. यानंतर पसरलेला धूर अत्यंत विषारी होता. या धुरामुळेच जाधव कुटुंब मृत्यूच्या दाढेत गेल्याची चर्चा घटनास्थळावरील नागरिक करीत होते. शिवाय एलईडी दिवे आणि पुठ्ठ्यांचे शेकडो बॉक्स, इलेक्ट्रिक वायरिंगचे बॉक्स ही आग वाढण्यास कारणीभूत ठरले.
रस्त्यात उभ्या चारचाकींचा अग्निशमन बंबाला अडथळा
पेट्रोलपंपामागील गल्लीत राहणाऱ्या जाधव कुटुंबाच्या घराला आग लागल्याचे कळताच अग्निशामक दलाचे जवान बंबासह उल्कानगरीत आले. मात्र गल्लीत उभ्या चारचाकी वाहनांनी मोठा अडथळा निर्माण केला होता. ही वाहने हटविताना सुमारे पंधरा ते वीस मिनिटे गेली. शेवटी जवानांनी पाईप ओढत जाधव यांच्या निवासस्थानापर्यंत नेला आणि आग विझविली.
गॅलरीचे दार तोडून शिडीवरून सर्वांना काढले बाहेर
मदतीसाठी धावलेल्या अग्निशामक दलाचे जवान आणि पोलीस यांनी धाडसाने जाधव यांच्या बंगल्याच्या गॅलरीपर्यंत शिडी लावली. हातोड्याने गॅलरीतील दार तोडून आत रांगत जाऊन बेशुद्ध पडलेला संस्कार आणि अर्धवट बेशुद्ध पडलेले श्यामसुंदर, सविता आणि संस्कृ ती यांना शिडीवरून खाली आणले आणि अॅम्ब्युलन्समधून हेडगेवार रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी संस्कारला तपासून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. अन्य तिघांवर तात्काळ उपचार सुरू केले. आणखी १० मिनिटे जरी उपचार मिळण्यास उशीर झाला असता तर त्यांचा अंत झाला असता, असे डॉक्टरांनी सांगितले.
संस्कारने आजोबाला केला मदतीसाठी कॉल
आगीच्या धुराने संपूर्ण घर कवेत घेतल्यानंतर गुदमरलेल्या अवस्थेत झोपेतून उठलेल्या संस्कारने न घाबरता शिवाजीनगर येथे राहणाऱ्या आजोबा शिंदे (सविता यांचे वडील) यांना मोबाईलवरून कॉल केला. आजोबा आमच्या घरात आग लागली आहे, आम्हाला वाचवा, अशी आर्त साद घातली. मात्र दुर्दैवाने संस्कारचा या घटनेत मृत्यू झाल्याने त्याने आजोबाला केलेला हा शेवटचा कॉल ठरला. संस्कार केम्ब्रिज शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिकत होता.
अशी लागली आग
एलईडी आणि सोलार लाईटच्या भांडारगृहाला आग लागून पसरलेल्या विषारी धुराने गुदमरून १० वर्षांच्या बालकाचा अंत झाला. गुदमरून बेशुद्ध झालेले आई-वडील आणि बहीण खाजगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. ही दुर्दैवी घटना उल्कानगरीमधील खिवंसरा पार्कमध्ये गुरुवारी (दि.२७) पहाटे ५ वाजेच्या सुमारास घडली. अग्निशामक दल आणि शेजाऱ्यांनी जलद मदत करून सर्वांना तात्काळ रुग्णालयात हलविले. तसेच आगीवर नियंत्रणही मिळविले. संस्कार श्यामसुंदर जाधव (१०) असे मृत बालकाचे नाव आहे. संस्कारचे वडील श्यामसुंदर बाबासाहेब जाधव (५०), आई सविता जाधव (४५), मोठी बहीण संस्कृती श्यामसुंदर जाधव (१८) यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. करंजखेड (ता.पैठण) येथील मूळ रहिवासी श्यामसुंदर जाधव हे एलईडी बल्ब आणि सोलार लाईट विक्र ीचा व्यवसाय घरातूनच आॅनलाईन करतात. काही वर्षे नाशिक येथे राहिल्यानंतर गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात जाधव कुटुंब औरंगाबादेतील उल्कानगरीतील बंगला क्रमांक ७५ मध्ये भाड्याने राहण्यास आले. या बंगल्याचे मालक पाठक हे पुण्याला राहतात. या बंगल्यात तळमजल्यावर चार खोल्या आणि पहिल्या मजल्यावर चार खोल्या आहेत. बंगल्याच्या आवारात आणि आतील खोल्यांमध्ये जाधव यांनी एलईडी आणि सोलार लाईटचा साठा ठेवला आहे. बुधवारी रात्री जेवणानंतर जाधव कुटुंब वरच्या मजल्यावरील बेडरूममध्ये झोपले. पहाटे ५ वाजेपूर्वी तळमजल्यातील मागील बाजूस ठेवलेल्या मालाला अचानक आग लागली.