पिस्टल चोरीप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 12:20 AM2018-01-09T00:20:48+5:302018-01-09T00:20:57+5:30
दारू पिऊन बेधुंद झालेल्या पोलीस कॉन्स्टेबलचे पिस्टल आणि दहा राऊंड चोरीला गेल्याचे समोर येताच पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी सोमवारी सकाळीच त्याला तडकाफडकी निलंबित केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : पोलीस गणवेश अंगावर असताना मित्रासोबत दारू पिऊन बेधुंद झालेल्या पोलीस कॉन्स्टेबलचे पिस्टल आणि दहा राऊंड चोरीला गेल्याचे समोर येताच पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी सोमवारी सकाळीच त्याला तडकाफडकी निलंबित केले. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा करीत असून, पिस्टल पळविणा-यांचा शोध सुरू आहे.
अमित स्वामी असे निलंबित केलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. पोलीस आयुक्त म्हणाले की, आकाशवाणी चौकात मद्याच्या नशेत तर्र असलेल्या स्वामीला रिक्षात बसलेला असताना अपघात झाला. या घटनेत स्वामी यांना मार लागला. या अपघातानंतर त्यांचे पिस्टल आणि दहा राऊंड चोरीला गेल्याचे समोर आले. अमितने जवाहरनगर ठाण्यात पिस्टल आणि राऊंड गहाळ झाल्याची तक्रार नोंदविली. सरकारी शस्त्र सांभाळण्यात निष्काळजीपणा केल्याने त्यांना निलंबित करण्यात आले. शिवाय त्यांची खातेनिहाय चौकशीत ते दोषी आढळल्यास त्यांना बडतर्फही केले जाऊ शकते. दरम्यान त्या रात्री अमित यांच्यासोबत असलेल्या रिक्षाचालक आणि त्याच्या मित्रांची पोलीस कसून चौकशी करीत आहेत. दोन संशयिताना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी दिली.