आत्मदहनाच्या इशाऱ्यामुळे पोलिसांचा दहा कार्यालयांत बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:02 AM2021-06-02T04:02:56+5:302021-06-02T04:02:56+5:30
गेवराई पायगा (ता. फुलंब्री) येथील मंगेश साबळे याने पंधरा दिवसांपूर्वी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मराठा समाजाचे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय ...
गेवराई पायगा (ता. फुलंब्री) येथील मंगेश साबळे याने पंधरा दिवसांपूर्वी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मराठा समाजाचे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय मान्य नसल्याचे सांगितले. पंधरा दिवसांत पुन्हा आरक्षण न मिळाल्यास १ जून रोजी औरंगाबादेतील सरकारी कार्यालयात आत्मदहनाचा इशारा दिला होता. हे आत्मदहन कोणत्या कार्यालयांत करणार, हे मात्र त्याने जाहीर केले नव्हते. एवढेच नव्हे तर तो पोलिसांना सापडत नव्हता. यामुळे पोलीस यंत्रणा अलर्ट झाली होती. मंगळवारी सकाळपासून पोलिसांनी त्याचे आत्मदहन रोखण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका, जिल्हा परिषद, जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय, सिडको कार्यालयासह एकूण १० सरकारी कार्यालयांत बंदोबस्त ठेवला होता. पोलीस अधिकारी, कर्मचारी प्रत्येक व्यक्तीवर नजर ठेवून होते. दरम्यान, दुपारी सावंगी टोलनाका येथे नाकाबंदीवरील पोलिसांनी साबळे याला ताब्यात घेतले. ते औरंगाबादला येत होते. साबळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजताच सर्वांचा जीव भांड्यात पडला.