एक पोलीस, एक गुन्हा; शहर पोलीस दलात नेल्सन योजना लागू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 12:15 PM2018-04-30T12:15:37+5:302018-04-30T12:17:56+5:30
शहर पोलीस दलात आता दरमहा एका पोलिसाकडे एकच गुन्हा तपासासाठी दिला जात आहे. त्यासाठी जास्तीत जास्त तपासी अंमलदार तयार करण्यासाठी २०० पोलिसांना तंत्रशुद्ध तपासाचे प्रशिक्षण नुकतेच नाशिक येथे देण्यात आले.
- बापू सोळुंके
औरंगाबाद : पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांचा तपास दर्जेदार आणि सबळ पुराव्यासह करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर केल्यास दोषसिद्धीचे प्रमाण वाढू शकते. ही बाब लक्षात घेऊन शहर पोलीस दलात आता दरमहा एका पोलिसाकडे एकच गुन्हा तपासासाठी दिला जात आहे. त्यासाठी जास्तीत जास्त तपासी अंमलदार तयार करण्यासाठी २०० पोलिसांना तंत्रशुद्ध तपासाचे प्रशिक्षण नुकतेच नाशिक येथे देण्यात आले.
शहरातील प्रत्येक ठाण्यात सरासरी १०० ते १३० पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असतात. पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, सहायक फौजदार, पोलीस हेड कॉन्स्टेबल आणि नाईक यांना गुन्ह्याचा तपास करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. शहरातील क्रांतीचौक, सिटीचौक आणि एमआयडीसी वाळूजसारख्या मोठ्या ठाण्यात रोज सरासरी पाच ते सहा गुन्हे दाखल होतात, तर पुंडलिकनगरसारख्या नव्या ठाण्यात रोज एका गुन्ह्याची नोंद होते. ज्यांना गुन्ह्याचा तपास करण्याचा अनुभव आहे, अशाच कर्मचाऱ्यांकडे तपास सोपविण्यात येतो. प्रत्येक ठाण्यातील अशा कर्मचाऱ्यांची संख्या ३० टक्के आहे.
परिणामी, अशा तपासी अंमलदारांकडे आठ ते दहा गुन्हे तपासासाठी असतात. यामुळे प्रत्येक गुन्ह्याचा तपास करताना बऱ्याचदा तपास अधिकाऱ्यांना घटनास्थळी न जाता ठाण्यात बसूनच पंचनामा करावा लागतो. तपास वेळेत करून आरोपींविरोधात सबळ पुराव्यासह दोषारोपपत्र दाखल होत नाही. ही बाब लक्षात घेऊन प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी नेल्सन योजना औरंगाबाद परिक्षेत्रात राबविली.
दीड महिन्यापूर्वी येथे रुजू झाल्यानंतर त्यांनी पहिल्या गुन्हे आढावा बैठकीत शिक्षेचे प्रमाण वाढविण्यासाठी नेल्सन योजनेनुसार एक गुन्हा एक पोलीस असे काम करण्याचे निर्देश दिले. एका पोलिसाकडे एका महिन्यात एकच गुन्हा असल्यास त्यांना तपास करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल आणि तपास योग्य पद्धतीने होऊन वेळेत दोषारोपपत्रही सादर करणे शक्य होईल. सबळ पुराव्यासह दोषारोपपत्र न्यायालयात गेल्यास आरोपीला शिक्षा लागू शकते. पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार विविध ठाण्यांतील पोलीस नाईक ते सहायक उपनिरीक्षक पदावरील २०० कर्मचाऱ्यांना दोन टप्प्यात नाशिक येथे प्रशिक्षण देण्यात आले.
काय आहे नेल्सन योजना?
ठाण्यात कार्यरत तपासी अंमलदारांपैकी प्रत्येकी एका अंमलदाराला दर एक महिन्याला गंभीर स्वरूपाचा गुन्हा तपासाला देणे. एकच गुन्हा तपासासाठी असल्याने तो गुन्ह्याच्या घटनास्थळी वेळीच भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा करेल, घटनास्थळावर आढळलेले पुरावे जमा करील, गुन्ह्याच्या तपासात वेळीच आरोपीला अटक करील. गुन्ह्यात आरोपींकडून काही जप्ती असेल तर ती करून न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठवील. साक्षीदारांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे जाबजबाब नोंदवील आणि सबळ पुराव्यांसह वेळीच न्यायालयात दोषारोपपत्र सादर करील.
शहरात सरासरी पाच हजार गुन्ह्यांची नोंद
खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, जबरी चोरी, लुटमार, दरोडा, दरोड्याचा प्रयत्न, वाटमारी, अपहरण, खंडणी मागणे, मारामारी, विनयभंग, बंदूक बाळगणे, वाहनचोऱ्या, विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त करणे, सदोष मनुष्यवध, लाच घेणे, फसवणूक करणे, अनैतिक देह व्यापार ,जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणे, बनावट कागदपत्रे तयार करणे, आदी गंभीर गुन्ह्यांची शहरातील संख्या सरासरी दोन हजार आहे. शिवाय अपघाताच्या गुन्ह्यांची संख्या दीड हजार, तर अन्य किरकोळ गुन्ह्यांची संख्या दोन हजार आहे.
२०० पोलिसांना नाशिक येथे प्रशिक्षण
पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार विविध ठाण्यांतील दोनशे पोलिसांना तंत्रशुद्ध तपासाचे नाशिक येथे दोन टप्प्यांत प्रशिक्षण देण्यात आले. शिवाय आणखी तपास अधिकारी निर्माण करण्यासाठी प्रशिक्षणाचे हे सत्र यापुढेही सुरूच राहणार आहे.
- डॉ. दीपाली धाटे-घाडगे, पोलीस उपायुक्त