फसवणुकीच्या गुन्ह्यात महिलेला पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 11:06 PM2019-03-24T23:06:02+5:302019-03-24T23:06:33+5:30
कॅनडात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणाची अडीच लाखांची फसवणूक करणाऱ्या आयशा शेख शकील या महिलेला रविवारी २६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
औरंगाबाद : कॅनडात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणाची अडीच लाखांची फसवणूक करणाऱ्या तिघा आरोपींपैकी आयशा शेख शकील (३३, रा. टिळकनगर, ता. सिल्लोड, ह.मु. गणेश कॉलनी, औरंगाबाद) या महिलेला रविवारी (दि.२४) प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन.ए. पठाण यांनी २६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
या गुन्ह्यात यापूर्वी पोलिसांनी आरोपी शेख शकील शेख भिकन याला अटक केली होती. न्यायालयाने त्याची रवानगी पोलीस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीत केली आहे, तर तिसरा आरोपी अमर ऊर्फ जुबेर चाऊस हा अद्यापही फरार आहे.
यासंदर्भात मोहंमद अदनान मोहंमद हारुण शेख (२५, रा. राधास्वामी कॉलनी, जटवाडा रोड, हर्सूल) यांनी तक्रार दिली होती की, त्याने एम.एस्सी. मायक्रो बॉयलॉजीचे पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहे. अदनानचा मित्र मोहम्मद अमर ऊर्फ मोहम्मद जुबेर चाऊस याने इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला असून, तो कॅनडा येथे नोकरी करतो. मोहम्मद अमर याने त्याचा मित्र आरोपी शेख शकील हा कन्सल्टन्सी चालवीत असून, तो विदेशात नोकरी लावून देतो. मी त्याच्याकडे कमिशन एजंट म्हणून काम करतो, असे अदनानला सांगितले. त्यानंतर मोहम्मद अमर याने अदनानची शेख शकील आणि आयशा शेख या दोघांची भेट घालून दिली. आरोपी दाम्पत्याने कॅनडामध्ये प्रयोगशाळेत (लॅबमध्ये) तंत्रज्ञाची (टेक्निशियनची) नोकरी लावून देतो, त्यासाठी साडेपाच लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले.
तडजोड होऊन मोहम्मदने अडीच लाख रुपये दिले. पैसे देऊनही नोकरी न लावल्याने मोहम्मद याने पैसे परत द्या म्हणत तगादा लवाला. त्यानंतर बेगमपुरा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी आयशा शेख हिला रविवारी (दि.२४) अटक करून न्यायालयात हजर केले असता सहायक सरकारी वकील ए.व्ही. घुगे यांनी न्यायालयास विनंती केली की, आरोपींकडून फिर्यादीचे अडीच लाख रुपये हस्तगत करावयाचे असून, आरोपींनी फिर्यादीचे घेतलेले पारपत्र (पासपोर्ट)देखील जप्त करावयाचे आहे. आरोपींनी अजून किती बेरोजगारांची फसवणूक केली याचा तपास करावयाचा असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्याची विनंती केली असता न्यायालयाने वरीलप्रमाणे आदेश दिला.
--------