तबलिगी जमातचा 'इज्तेमा' सोहळा होणार होता औरंगाबादेत; पोलिसांनी परवानगी नाकारल्याने अनर्थ टळला?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2020 10:37 AM2020-04-04T10:37:00+5:302020-04-04T10:56:07+5:30
या कार्यक्रमाला अंदाजे 50 हजार लोकांची उपस्थिती असणार होती, असा दावा तब्लीग इज्तेमा कमिटीने केला आहे.
औरंगाबाद- देशात वादग्रस्त ठरलेला दिल्लीतील ‘तबलिगी जमात’चा (इज्तेमा) मेळावा सारखाच कार्यक्रम औरंगाबादमध्ये 27-28 आणि 29 मार्च रोजी होणारा होता. मात्र कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कार्यक्रमाची परवानगी वेळीच रद्द करण्याची हुशारी दाखविल्याने जिल्ह्यासह महाराष्ट्रात होणारा प्रादुर्भाव रोखला गेला आहे. त्यांच्या या निर्णयाचे जिल्ह्यात कौतुक केले जात आहे.
तब्लीग इज्तेमा कमिटीने पत्रान्वये औरंगाबाद-पैठण रोडवरील गेवराई येथे पडीत पडलेल्या मैदानात मेळाव्याची परवानगी मागितली होती. परंतु कोरोनाचा राज्यातील अनेक भागात वाढता प्रसार पाहता या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला परवानगी देता येणार नसल्याचे चिकलठाणा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक आंधळे यांनी आयोजकांना कळविले.
या कार्यक्रमाच्या आयोजनाची तयारी करताना कार्यक्रमाची सर्व तयारी झाल्याने आपणास परवानगी मिळावी, अशी आयोजकांची विनंती पोलिसांनी लोकांच्या आरोग्याच्या पातळीवर फेटाळून लावली. कारण या कार्यक्रमाला अंदाजे 50 हजार लोकांची उपस्थिती असणार होती, असा दावा तब्लीग इज्तेमा कमिटीने केला आहे.
दिल्ली येथील कार्यक्रमाने संपूर्ण देशाला घाबरवून सोडले आहे. या कार्यक्रमामध्ये परदेशातील 18 मौलवींचा सहभाग असल्याची गंभीर बाब समोर आल्यामुळे शेकडो लोकांना या कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी वेळीच निर्णय घेत या कार्यक्रमाची परवानगी रद्द केल्याने मोठा अनर्थ टळला असल्याचे बोलले जात आहे.
या कार्यक्रमाला जवळपास 50 हजार लोकांची उपस्थिती अपेक्षित होती. त्यासाठी मंडप आणि इतर तयारी सुद्धा करण्यात येत होती. कार्यक्रमात बयाण करण्यासाठी मालेगाव किंवा इतर जिल्ह्यातून कुणाला बोलवायचं याचा निर्णय झाला नव्हता. ते कमिटीच्या बैठकीत ठरणार होते. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्याने हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. ( हुसेन मौलाना ,व्यवस्थापक तब्लीग इज्तेमा कमिटी )