वैजापुरात ‘धूम’ टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:25 AM2018-03-28T00:25:38+5:302018-03-28T10:26:31+5:30
खंडाळा, परसोडा येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेची कॅश लुटण्याच्या तयारीत असलेल्या चार जणांच्या ‘धूम’ टोळीला पोलिसांनी मंगळवारी दुपारी ४ वा. (दि.२७) रोटेगाव पुलाजवळ फिल्मीस्टाईल दुचाकीवर पाठलाग करून बेड्या ठोकल्या. यापैकी एक आरोपी पसार झाला असून, आरोपींच्या ताब्यातून २ दुचाकी, गावठी बंदूक, जिवंत काडतूस चाकू आदी मुद्देमाल जप्त केला. कारवाई स्थानिक गुन्हेशाखा व वैजापूर पोलिसांनी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वैजापूर : खंडाळा, परसोडा येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेची कॅश लुटण्याच्या तयारीत असलेल्या चार जणांच्या ‘धूम’ टोळीला पोलिसांनी मंगळवारी दुपारी ४ वा. (दि.२७) रोटेगाव पुलाजवळ फिल्मीस्टाईल दुचाकीवर पाठलाग करून बेड्या ठोकल्या. यापैकी एक आरोपी पसार झाला असून, आरोपींच्या ताब्यातून २ दुचाकी, गावठी बंदूक, जिवंत काडतूस चाकू आदी मुद्देमाल जप्त केला. कारवाई स्थानिक गुन्हेशाखा व वैजापूर पोलिसांनी केली.
आनंद छगन तानसरे (३१, रा.श्रीरामपूर), नितीन नामदेव जाधव (३८, रा. राहता), अमोल लक्ष्मण पारे (२४, रा. कोपरगाव), गणेश अशोक शिंदे (२४, रा. शिर्डी) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत, तर देवीदास जाधव (रा. महालगाव) हा त्यांचा साथीदार पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला.
बँकेचा पैसा लुटणारी टोळी रोटेगाव येथे पुलाजवळ येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
यावरून पोलिसांनी सापळा रचला असता पाच जण दोन दुचाकींवर तेथे पोहोचले. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी रसवंतीच्या मागे पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करत चौघांच्या मुसक्या आवळल्या.
मात्र, त्यांचा एक साथीदार पसार झाला. आरोपींच्या ताब्यातून दोन दुचाकी, एक गावठी बंदूक, एक जिवंत काडतूस, मिरचीपूड व चाकू मोबाईल फोन, खाज सुटणारी पावडर आदी साहित्य जप्त केले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक सचिन कापुरे, पोनि. सुभाष भुजंग, वैजापूरचे पोनि. अनिरुद्ध नांदेडकर, पोउनि. प्रतापसिंह बहुरे, सदानंद सिद्ध, संजय घुगे, मोईज बेग, गणेश मुळे, किरण गोरे, शेख नदीम, बाबासाहेब नवले, प्रमोद साळवी, योगेश तरमळे, सागर बोर्डे, जालिंदर तमनर, गणेश पाटील यांनी ही कारवाई केली. याप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
थरारक पाठलाग
रोटेगावच्या पुलाखाली पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला होता. दरोडेखोरांची टोळी असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी आरोपींना शरण येण्यास सांगितले मात्र, त्यांनी बंदुकीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तोच पोलिसांच्या पथकाने झडप घालून ४ जण ताब्यात घेतले. यावेळी एक आरोपी पसार झाला. दरम्यान, वैजापुरात दरोडेखोर येणार असल्याची माहिती देणारा कॉल अहमदनगर पोलिसांच्या नियंत्रण कक्षेतून आला होता, अशी माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले.