बोगस पदवी प्रकरणात पोलिसांना, विद्यापीठ प्रशासनाकडून मिळेना तपासात सहकार्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 17:45 IST2025-04-21T17:41:26+5:302025-04-21T17:45:01+5:30
विद्यापीठाच्या प्रशासनाकडून तपासासाठी आवश्यक कागदपत्रांची, पदव्यांची पडताळणी वेगात होत नसल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

बोगस पदवी प्रकरणात पोलिसांना, विद्यापीठ प्रशासनाकडून मिळेना तपासात सहकार्य
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने बनावट पदवीच्या आधारे पीएच.डी.ला प्रवेश घेतल्यामुळे खुलताबाद येथील कोहिनूर शिक्षण संस्थेच्या सचिव, सहसचिवाविरोधात गुन्हा नोंदविला. या गुन्ह्यातील आरोपींची संख्या पाचवर पोहोचली आहे. त्यात आणखी आरोपींचा समावेश होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्याच वेळी विद्यापीठाच्या प्रशासनाकडून तपासासाठी आवश्यक कागदपत्रांची, पदव्यांची पडताळणी वेगात होत नसल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळेच मुख्य आरोपीला जामीन मंजूर झाल्याचेही स्पष्ट झाले आहे.
विद्यापीठाने बोगस पदवी प्रकरणात कोहिनूर शिक्षण संस्थेच्या सचिव अस्मा खान, सहसचिव मकसूद खान यांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा नोंदविला. यानंतर अस्मा खानचा नवरा तथा संस्थेचा अध्यक्ष मजहर खान याला आरोपी करण्यात आले. त्याच वेळी कनिष्ठ महाविद्यालयात बनावट पदवीच्या आधारे मराठी व मानसशास्त्र विषयांत नोकरी मिळविणारा मोहंमद हफिज उररहमान मोहंमद मोईनोद्दीन याला अटक केली. या आरोपीने दिलेल्या माहितीच्या आधारे तत्कालीन प्राचार्य डॉ. शंकर अंभोरे यांना अटक केली. अटक आरोपींना न्यायालयाकडून पीसीआर मंजूर करण्यात येत आहे. मात्र, महाविद्यालयातील काहींनी बोगस पदव्यांच्या आधारे नोकरी मिळविल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या पदव्यांची तपासणी संबंधित विद्यापीठ, संस्थांकडून लवकरात लवकर करून घेण्याची जबाबदारी विद्यापीठ प्रशासनाची आहे. त्यात विद्यापीठाकडून पोलिसांना सहकार्य मिळण्यात दिरंगाई होत आहे. त्याचा फायदा प्रकरणातील आरोपी मकसूद खान याला झाला आहे. जिल्हा न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन मंजूर केला. तसेच विद्यापीठाने तक्रार देण्यासाठी उपकुलसचिवांना प्राधिकृत केल्याचे पत्रही अद्यापपर्यंत पोलिसांना दिलेले नसल्याची माहिती आहे.
प्रमुख आरोपींचे चौकशीत असहकार्य
पोलिसांनी अटक केलेला मुख्य आरोपी मजहर खान याला तीन वेळा पोलिस कोठडी मंजूर केली होती. या कालावधीत त्याने पोलिसांना पदव्यांची छपाई कोठे केली? कितीजणांना बनावट पदव्या दिल्या? या रॅकेटमध्ये इतर कोणाचा सहभाग आहे, याविषयी माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचे समजते. त्याशिवाय प्राचार्य डॉ. शंकर अंभोरे हेसुद्धा पोलिसांना तपासात सहकार्य करीत नसल्याचे समजते.