वाळू वाहतूक करणाऱ्या दुचाकी गँगवर पोलिसांचा हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:04 AM2021-02-06T04:04:56+5:302021-02-06T04:04:56+5:30
संजय जाधव पैठण : गोदावरी पात्रात वाळूचे अवैध उत्खनन करून दुचाकीवरून वाळू वाहतूक करणाऱ्या गँगच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. ...
संजय जाधव
पैठण : गोदावरी पात्रात वाळूचे अवैध उत्खनन करून दुचाकीवरून वाळू वाहतूक करणाऱ्या गँगच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. गेल्या पंधरा दिवसात चोरीची वाळू वाहतूक करणाऱ्या तब्बल ४३ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या. त्यामुळे या ग़ँगचे कंबरडे मोडले आहे. जप्त केलेल्या दुचाकींचा अहवाल पाठवून कारवाई प्रस्तावित करावी, असे पत्र पोलीस प्रशासनाच्यावतीने पैठण तहसीलदारांना दिले आहे.
तालुक्यातील गोदावरी पात्रातील वाळूला मोठी मागणी आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून गोदावरी पात्रातील वाळूपट्ट्यांचे लिलाव रखडलेले आहेत. त्यामुळे वाळूच्या वाढत्या मागणीमुळे वाळू तस्कर प्रशासनाची नजर चुकवून निरनिराळे प्रयोग करून वाळूचा उपसा करीत असल्याचे समोर आले आहे. ट्रॅक्टर, ट्रक, हायवा, टेम्पोद्वारे होणाऱ्या वाळू वाहतुकीस प्रशासनाकडून लगाम लावल्यामुळे वाळू तस्करांनी पर्याय म्हणून बैलगाडी, गाढवे आदीद्वारे वाळू वाहतूक सुरू केली. यात तालुक्यात मोठी साखळीच तयार झाली असून जवळपास तीनशे बैलगाड्या व शेकडो गाढवांवरून वाळू वाहतूक होऊ लागली आहे. महसूल व पोलीस प्रशासनाने यावर कारवाई केली. त्यामुळे बैलगाडी व गाढवांद्वारे होणाऱ्या वाळू वाहतुकीवर नियंत्रण आले.
त्यानंतर वाळू तस्करांनी यावरही नवीन शक्कल लढवून दुचाकीवर दोन्ही बाजूने खोळ टाकून वाळू वाहतूक करण्याचा उद्योग सुरू केला. प्रयोग यशस्वी झाल्यानंतर अनेक दुचाकीचालक या व्यवसायात उतरले आहेत. भंगार झालेल्या विना क्रमांकाच्या अतिशय कमी किमतीमध्ये दुचाकी घेऊन त्यावर वाळू वाहतूक सुरू झाली. जर पोलिसांनी कारवाई केली, तर जाग्यावर दुचाकी सोडून पळ काढायचा. त्यामुळे पोलिसांनी दुचाकी जप्त केल्या तरी पुन्हा त्याची चौकशी देखील करायची नाही. असेही प्रकार समोर आले आहेत.
पैठण ठाण्याचे निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गजानन जाधव, रामकृष्ण सागडे, छोटुसिंग गिरासे यांच्या पथकाने पंधरा दिवसात तब्बल ४३ दुचाकी जप्त केल्या. त्यापैकी २९ दुचाकी विनाक्रमांक असून १३ गाड्यांचे चेसीस क्रमांक दिसत नाहीत.
कोट :
वाळू तस्करांच्या मोड्स ऑपरेंडीचा अभ्यास केला असून कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी कठोर कारवाई केली जात आहे. महसूल व पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील वाळूचोरीला आळा घातला जात आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. - किशोर पवार, पोलीस निरीक्षक.
-----
फोटो : तालुक्यात याच दुचाकीवरून वाळू वाहतूक केली जात असे.