आॅनलाईन फसवणूक झालेल्या ३६ तक्रारदारांना पोलिसांनी मिळवून दिले पाच लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 11:42 PM2019-05-11T23:42:00+5:302019-05-11T23:42:09+5:30
भामट्यांनी आॅनलाईन पळविलेली रक्कम परत मिळेलच याची खात्री नसते. मात्र सायबर पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ३६ तक्रारदारांना त्यांचे पाच लाख रुपये परत मिळवून दिले.
औरंगाबाद : विविध प्रकारच्या थापा मारून सामान्यांकडून एटीएम कार्डची माहिती विचारून घेत त्यांच्या खात्यातून आॅनलाईन पैसे पळविण्याच्या घटना सतत घडत असतात. आॅनलाईन फसवणुक ीचे वर्षभरात शंभरहून अधिक गुन्हे सायबर पोलीस ठाण्यात दाखल होतात. भामट्यांनी आॅनलाईन पळविलेली रक्कम परत मिळेलच याची खात्री नसते. मात्र सायबर पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ३६ तक्रारदारांना त्यांचे पाच लाख रुपये परत मिळवून दिले.
देशभरात विविध ठिकाणी बसलेले सायबर गुन्हेगार फोनद्वारे सामान्यांशी संपर्क साधून मी अमुक बँकेतून बोलतो. तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक झाले अथवा एटीएम कार्डची मुदत संपल्याने नूतनीकरण करण्यासाठी एटीएम कार्डची माहिती विचारून घेतात. फोन करणारा बँक अधिकारी असल्याचे समजून सामान्य नागरिक तो विचारील ती माहिती देन मोकळे होतात आणि अवघ्या काही सेकंदात बँक खात्यातील रक्कम आरोपी काढून घेतो.
यासोबतच ओटीपी क्रमांक विचारून आणि एटीएम कार्डची कोणतीही माहिती न विचारता, बँक खात्यातून पैसे पळविण्याच्या घटना घडत आहेत. सायबर गुन्हेगार विविध प्रकारच्या इंटरनेटच्या लिंक, अॅप्लिकेशन मोबाईलवर पाठवून ते ओपन करायला सांगतात. जे लोक अशा प्रकारच्या अनोळखी लिंक ओपन करतात, त्यांच्या खात्याची माहिती आॅनलाईन पद्धतीने गुन्हेगार मिळवितात आणि ग्राहकांच्या बँक खात्यातील रक्कम परस्पर काढून घेतात. अशा प्रकारच्या सुमारे शंभरहून अधिक तक्रारी पोलिसांकडे येतात.
सायबर गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने पोलीस आयुक्तालयात स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे सुरू करण्यात आले. जानेवारी महिन्यात प्राप्त तक्रारींपैकी ११ तक्रारदारांना १ लाख ८८ हजार रुपये, फेब्रुवारीत १५ जणांना १ लाख २१ हजार ९६ रुपये तर मार्च महिन्यात १० तक्रारदारांना १ लाख ८८ हजार ६३९ रुपये परत मिळवून दिले. पोलीस कर्मचारी विवेक औटी, रवी खरात, रेवणनाथ गवळी, सुदर्शन एखंडे, प्रशांत साकला आणि सुशांत शेळके यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही रक्कम मिळवून दिल्याचे सहायक निरीक्षक डॉ. राहुल खटावकर यांनी सांगितले.