विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांनी नोंदविले एक हजार गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:05 AM2021-04-23T04:05:11+5:302021-04-23T04:05:11+5:30
औरंगाबाद: कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत घालून दिलेल्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदार, रिक्षाचालक आणि अन्य नागरिकांवर ...
औरंगाबाद: कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत घालून दिलेल्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदार, रिक्षाचालक आणि अन्य नागरिकांवर शहर पोलिसांनी तब्बल १ हजार गुन्हे नोंदविले. एवढेच नव्हे तर विनामास्क फिरणाऱ्या ७ हजार ५०८ नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली. ही कारवाई १२ मार्च ते २१ एप्रिल दरम्यान करण्यात आली.
जिल्हा प्रशासनाने १२ मार्चपासून जिल्ह्यात ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत काही निर्बंध घातले. रिक्षात केवळ २ प्रवाशांची वाहतूक करणे, दुकानात सॅनिटायझर, थर्मल गण आणि ऑक्सिमीटर ठेवणे बंधनकारक केले. सुरुवातीला रात्री ८ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची वेळ होती. शिवाय रात्री ८ ते सकाळी ७ या कालावधीत संचारबंदी होती. संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर पोलिसानी गुन्हे नोंदविले. १२ मार्च ते २१ एप्रिल या कालावधीत पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील १७ पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तब्बल १ हजार गुन्हे नोंदविले. ही माहिती विशेष शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक बनकर यांनी दिली.
======(==============
चौकट
७ हजार ५०८ विनामास्क नागरिकांनी भरला ३७ लाख ७२ हजार ७०० रुपये दंड
वारंवार सांगूनही लोक मास्कचा वापर करीत नाही. अशा बेजबाबदार विनामास्क नागरिकांवर पोलिसांकडून १२ मार्चपासून दंडात्मक कारवाई केली जात आहे. विनामास्क नागरिकाला ५०० रुपये दंड आकारला जात आहे. १२ मार्च ते २१ एप्रिल या कालावधीत पोलिसांनी ७ हजार ५०८ जणांवर विनामास्कची कारवाई केली. या कारवाईत त्यांच्याकडून ३६ लाख ७२ हजार ७०० रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती विशेष शाखेकडून मिळाली. शहरातील १७ पोलीस ठाणे आणि वाहतूक शाखेने ही कारवाई केली.