शेतीच्या वादातून नवऱ्याचे अपहरण झाल्याचा बनाव पोलिसांमुळे उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:05 AM2021-05-29T04:05:21+5:302021-05-29T04:05:21+5:30
याविषयी अधिक माहिती देताना चिकलठाणा पोलिसांनी सांगितले की, सिडको एन-७ मधील अयोध्यानगर येथील रहिवासी अनिता गोरख पळसकर यांनी आज ...
याविषयी अधिक माहिती देताना चिकलठाणा पोलिसांनी सांगितले की, सिडको एन-७ मधील अयोध्यानगर येथील रहिवासी अनिता गोरख पळसकर यांनी आज सकाळी चिकलठाणा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत तिचे पळशी येथील त्यांचे भाऊबंद सुखदेव गणपत पळसकर आणि त्यांच्या तीन मुलांसोबत त्यांचा शेतीचा वाद सुरू आहे. २७ मे रोजी रात्री त्यांचे पती गोरख हे वादावर तोडगा काढण्यासाठी सुखदेव यांच्यासोबत बोलायला दुचाकीने गेले होते. मात्र रात्री त्यांना सुखदेव आणि त्यांच्या मुलांनी मारहाण करीत होते, ही बाब तिच्या पतीने तिला फोन करून कळविली. फोन चालू असताना मोबाइल बंद झाला. यावेळी आरोपींनी गोरख यांचे अपहरण केल्याचे तक्रारीत नमूद केले. या तक्रारीनंतर पोलीस उपअधीक्षक विशाल नेहुल, पूजा गायकवाड, सहाय्यक निरीक्षक विश्वास पाटील, उपनिरीक्षक प्रदीप ठुबे, आजिनाथ शेकडे, रवि साळवे, सोपान डकले, दीपक सुरासे, दीपक देशमुख आणि अण्णा गावंडे यांच्या पथकाने तपास केला. तेव्हा पळशी रस्त्यावर तक्रारदार यांच्या पतीची मोटारसायकल पडलेली दिसली. दुचाकीला चावी तशीच होती. यासोबतच त्यांचा बंद मोबाइल आणि चप्पल पडलेली दिसली.
तक्रारदार आणि सुखदेव पळसकर यांच्या जमिनीची मोजणी झाली होती. तेव्हा अर्धा एकर जमीन तक्रारदार येथील शेतातून गेली. या जमिनीचा ताबा सुखदेव हे घेणार आहेत. त्यांनी ही जमीन घेऊ नये याकरिता त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली होती. असे समजले.
चौकट
वाघलगावातील नातेवाइकाच्या घरातून गोरखला घेतले ताब्यात
अधिक तपासांत तक्रारदार यांचा पती वाघलगाव (ता. फुलंब्री) येथे नातेवाइकाच्या घरात लपून बसल्याचे समजले. पोलिसांनी गोरखला वाघलगाव येथून ताब्यात घेतल्यावर महिलेच्या बोगस तक्रारीचा पर्दाफाश झाला.