‘पहिली’, ‘दुसरी’च्या वादातून शिवाजीनगरात पोलीस पती-पत्नीत तुंबळ हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 11:27 PM2019-02-06T23:27:21+5:302019-02-06T23:27:43+5:30
याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात परस्परविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.
औरंगाबाद : पुण्यात पोलीस दलात असलेल्या पती व त्याच्या कुटुंबियांना औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलात कार्यरत पत्नी व तिच्या कुटुंबियांनी बेदम मारहाण करून जखमी केले. शिवाजीनगरातील खेडकर हॉस्पिटलसमोर मंगळवारी (दि.५) भरदुपारी पोलीस कुटुंबियांत फ्री स्टाईल हाणामारी झाली. फायटरच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चौघांना घाटीत उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात परस्परविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.
रवी संपत चव्हाण (पो.कॉ. विश्रांतवाडी पोलीस ठाणे, पुणे), संपत चव्हाण (वडील), शशीकला चव्हाण (आई), नितीन घुमा चव्हाण (चुलत भाऊ, सर्व रा. पुंडलिकनगर) हे चौघे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस सूत्रांनी सांगितले की, गणेश संपत चव्हाण (रा. पुंडलिकनगर) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांची पत्नी सोनल हिला शिवाजीनगरातील खेडकर हॉस्पिटल येथे सोमवारी प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. तिच्या देखभालीसाठी त्यांचे वडील, आई, सासू रात्रभर रुग्णालयात थांबले होते. त्यांचा भाऊ पो. कॉ. रवी हा मंगळवारी पुण्याहून रुग्णास भेटण्यासाठी आला होता.
तो रुग्णालयात येताच छाया हिरालाल राठोड, त्यांचा भाऊ संदीप हिरालाल राठोड, सरला प्रभाकर माने, संदेश हिरालाल राठोड, हिरालाल दगडू राठोड, सचिन हिरालाल राठोड, सरला हिरालाल राठोड, अनिल चव्हाण व अन्य दहा जणांनी अचानक मारहाण सुरू केली. त्यांनी फायटरने मारहाण केल्याने रवीसह त्यांचे आई-वडील, चुलत भाऊ, सासू गंभीर जखमी झाले. किमान अर्धा तास सुरू असलेल्या हाणामारीची माहिती मिळाल्याने पुंडलिकनगर ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना घाटीत दाखल केले. आरोपींविरुद्ध पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास फौजदार विकास खटके करीत आहेत.
काय आहे प्रकरण
चिकलठाणा पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलीस छाया हिरालाल राठोड यांनी रवी हा त्यांचा पती असल्याचे म्हटले आहे. पहिली पत्नी जिवंत असताना रवीने सोनलसोबत गुपचूप विवाह करून बाळंतपणासाठी तिला येथे आणल्याचा आरोप केला. रवी त्याच्या दुसऱ्या पत्नीला पाहण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्याने छाया व त्याचे ग्रामीण पोलीस दलातील भाऊ संदीप हिरालाल राठोड, पो.कॉ. सरला प्रभाकर माने व अन्य नातेवाईकांसह या रुग्णालयाच्या परिसरातच दबा धरून बसल्या होत्या. रवी दिसताच त्यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढविला.
छाया यांचे वडील हिरालाल दगडू राठोड (रा. शिवगड तांडा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, रवीने परस्पर विवाह केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलो असता रवी चव्हाण, संपत चव्हाण, शशीकला चव्हाण, नितीन चव्हाण, सचिन चव्हाण, तुळशीराम राठोड, सुनीता चव्हाण, सोनाली चव्हाण, पारूबाई आडे, शांतीलाल राठोड, दिलीप चव्हाण, गणेश चव्हाण यांनी हल्ला केला. याप्रकरणी फौजदार टी.आर. सोनवणे तपास करीत आहेत.
कायद्याचे रक्षक भिडले
कायद्याचे रक्षक असतानाही सार्वजनिक ठिकाणी एकमेकांच्या अंगावर धावून जाऊन फायटरने हाणामारी केली. सीसीटीव्हीत हा प्रकार कैद झाला आहे.
सोनल कुणाची पत्नी?
रवीचा भाऊ गणेशने सोनल त्याची पत्नी असल्याचे पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, तर छाया राठोड यांचे वडील हिरालाल राठोड यांनी ती रवीची दुसरी बायको असल्याचे म्हटले आहे.
पहा व्हिडिओ :