झटपट श्रीमंत होण्याच्या आमिषाने खबऱ्या बनला अट्टल दुचाकी चोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 02:27 PM2018-12-20T14:27:47+5:302018-12-20T14:30:34+5:30
चोरीच्या सव्वा लाख रुपये किमतीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या.
वाळूज महानगर (औरंगाबाद ) : चोरी केलेली दुचाकी विक्रीच्या शोधात असलेल्या एका संशयितास बुधवारी (दि. १९) एमआयडीसी वाळूज पोलिसांनी अटक केली. या भामट्याच्या ताब्यातून चोरीच्या सव्वा लाख रुपये किमतीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्याचा साथीदार मात्र फरार आहे.
वाळूज एमआयडीसीतील कामगार चौकात एक जण चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली होती. त्यावरून पोलीस पथकाने कामगार चौकात सापळा रचला होता. सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास संशयित व्यक्ती दुचाकीवर जात असताना पोलिसांनी त्यास अडविले. त्याच्याकडे दुचाकीच्या कागदपत्रांची मागणी केली असता त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांचा संशय बळावला होता.
सव्वा लाखाच्या पाच दुचाकी जप्त
पोलिसांनी त्याला पकडून ठाण्यात आणून कसून चौकशी केली. सय्यद सिराज (३०, रा. दौलताबाद) असे त्याचे नाव आहे. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने एका साथीदाराच्या मदतीने विविध ठिकाणांवरून पाच दुचाकी चोरल्याची कबुली देत या दुचाकी दौलताबादेतील राहत्या घरी लपवून ठेवल्याची माहिती दिली.
आरोपीने लपवून ठेवलेल्या पाच दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
झटपट श्रीमंतीच्या आमिषाने झाला चोर
आरोपी सय्यद सिराज हा मूळचा पंढरपूर येथील रहिवासी असून, तो काही वर्षांपूर्वी दौलताबादला राहण्यासाठी गेला होता. सुरुवातीला सिराज हा पोलिसांचा खबऱ्या म्हणून काम करीत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले. खबऱ्या म्हणून काम करताना पोलीस दलाचे कामकाज कसे चालते याची माहिती झाल्यानंतर झटपट श्रीमंत होण्यासाठी तो दुचाकी चोरीकडे वळला. एका साथीदाराच्या मदतीने सिराज विविध ठिकाणावरून दुचाकी चोरून आणत होता. त्याचा साथीदार पसार असून या दोघांकडून आणखी काही दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकप्रमुख राहुल रोडे, पोेहेकॉ. वसंत शेळके, पोना. फकीरचंद फडे, सुधीर सोनवणे, प्रकाश गायकवाड, शैलेंद्र अडियाल, पोकॉ. मनमोहन कोलिमी, राजकुमार सूर्यवंशी, देवीदास इंदोरे, बाळासाहेब आंधळे, प्रदीप कुटे आदींच्या पथकाने ही कामगिरी बजावली.