पोलीस निरीक्षकांनी स्वत:च्या खुर्चीवर बसवून ज्येष्ठ महिलेचा केला सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:02 AM2021-03-09T04:02:26+5:302021-03-09T04:02:26+5:30
दौलताबाद : जागतिक महिला दिनानिमित्त दौलताबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ज्येष्ठ महिलांना ठाण्यात बोलवून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. पोलीस ...
दौलताबाद : जागतिक महिला दिनानिमित्त दौलताबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ज्येष्ठ महिलांना ठाण्यात बोलवून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. पोलीस ठाण्याचे नेमके कामकाज कसे चालते, याबाबत मार्गदर्शन करीत पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांनी महिलांशी संवाद साधला. उभ्या आयुष्यात कधी पोलीस ठाण्याची पायरीही न चढलेल्या महिलांसाठी हा अनुभव खूप आनंद देणारा होता. त्यात एका आजीला थेट पोलीस निरीक्षकांच्या खुर्चीत बसवून त्यांच्या डोक्यावर टोपी ठेवून त्यांचा सन्मान करण्यात आल्याने त्या आजी भारावून गेल्या. हा अनोखा कार्यक्रम सर्वांसाठी अविस्मरणीय ठरणार, यात तिळमात्र शंका नाही.
दौलताबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जवळपास सत्तर जणींना महिला दिनानिमित्त ठाण्यात निमंत्रित करण्यात आले होते. यात लहान मुलींसह वयोवृद्ध महिलांचा समावेश होता. पोलीस ठाण्याचा कारभार हाती असलेल्या पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांनी महिला दिनाचे औचित्य साधून या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ज्यांनी उभ्या आयुष्यात कधीही पोलीस ठाण्याची पायरी चढलेली नाही. अशा महिलांना प्रथमच सन्मानाने ठाण्यातील कामकाज दाखविले जात होते. त्यांच्याशी पोलीस अधिकारी संवाद साधत असल्याचा अनुभव त्यांना अधिक आनंद देणारा ठरला. एवढ्यात देवकाबाई किशन मनोरे (वय ७५, रा. वांजरवाडी) व आबेदा मोहम्मद निसार (वय ७५, छोटीमंडी) या दोन वृद्ध महिलांना पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांनी स्वतःच्या खुर्चीवर बसवून आपली टोपी त्यांना घालून महिला दिनानिमित्त अनोखी भेट दिली. यावेळी दोन्ही आजींच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. यावेळी माळीवाडाच्या सरपंच अनिता हेकडे, दौलताबादचे उपसरपंच नूरजहाँ बेगम, आसेगावच्या सरपंच गिरिजा प्रभू बागुल, फतीयाबाद नंदाबाई साठे, अब्दीमंडीच्या उपसरपंच शगुफता साबेर पठाण, जांभळाच्या सरपंच चित्रा गणेश शेलार, माजी सरपंच शाहीन बेगम शेख मुनीर, सुशीला गेहलोत, लक्ष्मीबाई खडागळे आदींची उपस्थिती होती.
जवानाच्या आई व पत्नीचा सन्मान
भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेल्या योगेश आढाव यांच्या आई सुनिता आढाव व पत्नी पूजा आढाव यांचा विशेष सत्कार केला. त्याचबरोबर महिलांना रायफल व इतर शस्त्रसाठा दाखविण्यात आला. तर परिसरातील ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या महिला सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांचादेखील सत्कार करण्यात आला.
फोटो :