स्वत:वर गोळी झाडून सहाय्यक पोलीस निरीक्षकाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 11:41 AM2019-02-15T11:41:54+5:302019-02-15T12:56:09+5:30
अंबड तालुक्यातील गोंदी येथील सहायक पोलिस निरीक्षक अनिल परजणे यांनी शुक्रवारी (14 फेब्रुवारी) सकाळी १० वाजेच्या दरम्यान स्वत:कडे असलेल्या रिव्हॉल्व्हर गोळी झाडून घेवून आत्महत्या केली आहे.
जालना : अंबड तालुक्यातील गोंदी येथील सहायक पोलीस निरीक्षक अनिल परजणे यांनी शुक्रवारी (14 फेब्रुवारी) सकाळी १० वाजेच्या दरम्यान स्वत:कडे असलेल्या रिव्हॉल्व्हर गोळी झाडून घेवून आत्महत्या केली आहे.
ही आत्महत्या त्यांनी कोणत्या कारणामुळे केली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. गेल्या दोन वर्षांपासून गोंदी येथील पोलीस ठाण्यात ते कार्यरत होते. मध्यंतरी वाळू माफीयांच्या मुद्यावरून त्यांचे आणि वाळू माफीयांचे तसेच पोलीस दलातील वरिष्ठांसोबत किरकोळ वाद झाले होते. ते मुळचे अंमलनेर तालुक्यातील रहिवाशी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. या घटनेची माहिती मिळाल्यावर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस उप. निरीक्षक सी. डी. सेवगन तसेच पो. उप. नि. हनुमंत वारे यांनी गोंदी येथे भेट दिली.
पोलिसांच्या खालापुरी गावातील अनिल परजणे हे पहिले अधिकारी
खालापुरी गावात पोलीस शिपायापासून ते सहायक पोलीस निरीक्षकपर्यंत अधिकारी आहेत. या गावाची पोलिसांचे गाव म्हणून ओळख आहे. २००६ साली अनिल परजणे हे पोलीस उपनिरीक्षक म्हणून भरती झाले. नागपूरात त्यांना पहिली पोस्टींग मिळाली. सध्या ते जालना जिल्ह्यातील गोंदी पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक म्हणून कर्तव्य बजावत होते. त्यांच्या आत्महत्येची वार्ता समजताच खालापुरी गावात दुखवटा पाळण्यात आला. सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
सामाजिक बांधिलकीतून मदत
अनिल परजणे सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात. नुकताच परजणे मित्र मंडळाच्यावतीने आयोजित नेत्र तपासणी शिबीरात ते प्रमुख पाहुणे म्हणून खालापुरीत आले होते. याचवेळी त्यांनी गावात विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या लायब्ररीसाठी १० हजार रूपये देण्याची घोषणा केली होती, असे जवळच्या लोकांनी सांगितले. तसेच गावात राबविलेल्या इतर सामाजिक उपक्रमांत ते आघाडीवर होते, असेही सांगण्यात आले.
अनिल परजणे इतरांसाठी आदर्श
अनिल परजणे हे अधिकारी झाल्यानंतर त्यांनी गावातील इतर तरूणांना प्रोत्साहन दिले. मार्गदर्शन केले. त्यांची प्रेरणा घेऊन गावातील बहुतांश तरूण पोलीस दलात भरती झाले आहेत. ते गावासाठी एक आदर्श होते.