मढ्याच्या टाळूवरचे लाेणी खाण्याचा प्रकार;मृताच्या मुलाकडून फौजदाराने घेतली १० हजारांची लाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2022 07:01 PM2022-02-15T19:01:41+5:302022-02-15T19:02:34+5:30
दौलताबाद पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची वर्षभरातील ही तिसरी कारवाई आहे.
औरंगाबाद : काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघाताचा पंचनामा आणि अन्य कागदपत्रे देण्यासाठी दहा हजार रुपये लाच घेताना दौलताबाद पोलीस ठाण्यासमोरच पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून मंगळवारी सकाळी रंगेहाथ पकडले.
दौलताबाद पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची वर्षभरातील ही तिसरी कारवाई आहे. रविकिरण आगतराव कदम (३९) असे या उपनिरीक्षकाचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार, दौलताबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. या अपघातात तक्रारदाराच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. या अपघातप्रकरणी तक्रारदारास मोटार वाहन अपघात न्यायालयात नुकसान भरपाईचा दावा दाखल करायचा आहे. याकरिता त्यांना अपघातस्थळाचा पंचनामा, शवविच्छेदनापूर्वीचा पंचनामा, एफआयआरची प्रत आणि अन्य कागदपत्रांची आवश्यकता होती. अपघाताचा तपास पोलीस उपनिरीक्षक रविकिरण कदमकडे होता. यामुळे तक्रारदाराने कदमकडे अपघातासंबंधी कागदपत्रांची मागणी केली. कदमने १० हजार रुपये लाचेची मागणी केली.
तक्रारदारांनी वडिलांच्या मृत्यूमुळे खूप दु:खी असल्याचे तसेच आर्थिक परिस्थिती पैसे देण्यासारखी नसल्याचे सांगितले. मात्र पैसे दिल्याशिवाय कागदपत्रे मिळणार नाहीत, असे कदम यांनी बजावले. तक्रारदारांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी लाचेच्या मागणीची पडताळणी केली, तेव्हाही कदमने १० हजार रुपये लाचेची मागणी केली. मंगळवारी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दौलताबाद पोलीस ठाण्याच्या परिसरात सकाळपासून सापळा रचला. कदमने पोलीस ठाण्यासमोरच तक्रारदाराकडून लाचेचे १० हजार रुपये घेताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला लाचेच्या रकमेसह रंगेहाथ पकडले. या प्रकरणी दौलताबाद ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई पोलीस निरीक्षक शुभांगी सूर्यवंशी, अंमलदार विलास चव्हाण, मिलिंद इप्पर, सुनील बनकर, चंद्रकांत बागुल यांच्या पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केली.
पोलीस निरीक्षकानंतर, उपनिरीक्षकावर कारवाई
वाळू वाहतूकदाराकडून हप्ता घेताना वाहतूक शाखेच्या निरीक्षकाला पकडल्यानंतर आता दौलताबाद ठाण्यातील उपनिरीक्षकाला लाच घेताना पकडले. लाचखोरी आणि हप्तेखोरी सहन केली जाणार नसल्याचे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले असताना निर्ढावलेले पोलीस अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकत आहेत.