लाच प्रकरणात अटक असलेल्या पोलीस निरीक्षक वसीम हाश्मी यांना आयुक्तांनी केले निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 07:33 PM2017-10-14T19:33:01+5:302017-10-14T19:33:48+5:30
गुन्हा दाखल न करण्यासाठी तक्रारदाराकडून ३५ हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडलेल्या बेगमपुरा ठाण्याचे निरीक्षक वसीम हाश्मी यांना पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी शुक्रवारी रात्री उशिरा तडकाफडकी निलंबित केले.
औरंगाबाद, दि. १४ : गुन्हा दाखल न करण्यासाठी तक्रारदाराकडून ३५ हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडलेल्या बेगमपुरा ठाण्याचे निरीक्षक वसीम हाश्मी यांना पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी शुक्रवारी रात्री उशिरा तडकाफडकी निलंबित केले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून त्यांच्यावरील कारवाईविषयी अहवाल प्राप्त होताच पोलीस आयुक्तांनी कारवाई केली.
पोलीस निरीक्षक वसीम हाश्मी यांना ३५ हजार रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका-यांनी सापळा रचून १२ आॅक्टोबर रोजी रात्री बेगमपुरा ठाण्यातच पकडले. शुक्रवारी सायंकाळी न्यायालयाने त्यांना १६ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. या कारवाईची माहिती एसीबीच्या औरंगाबाद परिक्षेत्राचे अधीक्षक श्रीकांत परोपकारी यांनी दुस-याच दिवशी दुपारी पोलीस आयुक्तांना दिली होती. शिवाय सायंकाळी एसीबी कार्यालयाकडून सविस्तर अहवाल पोलीस आयुक्तालयाला पाठविण्यात आला.
हा अहवाल प्राप्त होताच पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी पोलीस निरीक्षक हाश्मी यांच्यावर रात्री उशिरा निलंबनाचे आदेश जारी केले. पोलीस आयुक्तांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, हाश्मी यांची खातेनिहाय चौकशी केली जाणार आहे. शिवाय बेगमपुरा ठाण्याचा चार्ज पोलीस उपनिरीक्षक राहुल रोडे यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात सोपविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.