लाच घेताना पकडताच पोलीस निरीक्षकाची बिघडली प्रकृती, न्यायालयाने दिली १६ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 07:02 PM2017-10-13T19:02:47+5:302017-10-13T19:04:28+5:30
गुन्हा दाखल न करण्यासाठी एका जणाकडून ३५ हजार रुपये लाच घेताना बेगमपुरा ठाण्याचे निरीक्षक वसीम हाश्मी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडल्यानंतर रात्री उशीरा त्यांची प्रकृती बिघडली.दरम्यान, शुक्रवारी दुपारी विशेष न्यायालयाने त्यांना १६ आॅक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली.
औरंगाबाद, दि. १३ : गुन्हा दाखल न करण्यासाठी एका जणाकडून ३५ हजार रुपये लाच घेताना बेगमपुरा ठाण्याचे निरीक्षक वसीम हाश्मी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडल्यानंतर रात्री उशीरा त्यांची प्रकृती बिघडली. रक्तदाब वाढल्याने त्यांना घाटीत दाखल करण्यात आले. दुपारी त्यांचा रक्तदाब सामान्य होताच डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज दिला. दरम्यान, शुक्रवारी दुपारी विशेष न्यायालयाने त्यांना १६ आॅक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली.
गुरूवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास बेगमपुरा ठाण्यात एका जणाकडून ३५ हजार रुपये लाच घेतल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. नंतर त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात नेण्यात आले. तेथे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत असताना हाश्मी यांचा रक्तदाब वाढला. यानंतर पोलिसांनी त्यांना घाटीतील वॉर्ड क्रमांक ५ मध्ये दाखल केले. गार्डच्या निगराणीखाली त्यांच्यावर उपचार करण्यात आले. दुपारी डॉक्टरांनी त्यांना घाटीतून डिर्स्चाज केला.
यानंतर एसीबीच्या पोलिसांनी त्यांना रितसर अटक करून विशेष न्यायालायाचे न्यायाधीश जे.एन.राजे यांच्यासमोर हजर केले. यावेळी तपास अधिकारी उपअधीक्षक वर्षाराणी पाटील यांनी न्यायालयास सांगितले की, आरोपी हाश्मी यांच्या घराची रात्री झडती घेण्यात आली. मात्र तेथे काहीही मिळाले नाही. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने त्यांची चौकशी करता आली नाही. त्यांची बँक खाती आणि मालमत्तेविषयी विचारपूस करायची असल्याने त्यांना पोलीस कोठडी देण्याची विनंती केली. पोलीस अधिका-यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने हाश्मीला १६ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेशित केल्याची माहिती उपअधीक्षक वर्षाराणी पाटील यांनी दिली.
सुभेदारीत सुट ची घेतली झडती
सुभेदारी विश्राम गृहातील वेरूळ इमारतीत हाश्मी यांनी मे महिन्यापासून एक सुट बुक करून ठेवला होता. ते अधून मधुन त्या सुटमध्ये मुक्काम करायचे अशी माहिती पोलिसांना मिळाली. यामुळे त्यांच्या घराच्या झडतीसोबतच एसीबीच्या अधिका-यांनी सुभेदारी विश्रामगृहातील त्यांचा मुक्काम असलेल्या सुटची झडती घेतली. तेथे काय मिळाले, याबाबतची माहिती मात्र पोलिसांनी सांगितली नाही. पोलिसांनी सुभेदारी विश्रामगृहातील त्यांच्या मुक्कामाची नोंद असलेले रजिस्टर जप्त केले.