सुरडकर खून प्रकरणात विविध संशयितांची पोलिसांकडून चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 11:31 PM2019-04-03T23:31:31+5:302019-04-03T23:32:15+5:30
इंग्रजी शाळेचे मालक विश्वास सुरडकर यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या बेगमपुरा पोलीस आणि गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी संशयितांची चौकशी सुरू केली. चार दिवसांमध्ये सहा ते सात जणांची चौकशी करण्यात आली. मात्र प्रत्येकाने आपण विश्वास यांना पैसे दिले होते. त्यांच्या खुनाच्या घटनेने आपल्याला धक्काच बसल्याचे पोलिसांना सांगितले आहे.
औरंगाबाद : इंग्रजी शाळेचे मालक विश्वास सुरडकर यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या बेगमपुरा पोलीस आणि गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी संशयितांची चौकशी सुरू केली. चार दिवसांमध्ये सहा ते सात जणांची चौकशी करण्यात आली. मात्र प्रत्येकाने आपण विश्वास यांना पैसे दिले होते. त्यांच्या खुनाच्या घटनेने आपल्याला धक्काच बसल्याचे पोलिसांना सांगितले आहे.
विश्वास सुरडकर यांचा ३१ मार्च रोजी रात्री हिमायतबागेत मृतदेह आढळला होता. याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात झाला. तेव्हापासून बेगमपुरा पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला. घटना उघडकीस येऊन आज चार दिवस झाले. मात्र अद्यापही हा खून कोणी, कसा आणि का केला, याचा उलगडा पोलिसांना करता आला नाही. सुरडकर यांनी त्यांच्या मालकीची शाळा विकसित करण्यासाठी संशयित आरोपी राजू दीक्षित यांच्याकडून ८६ लाख रुपये घेतले होते. शिवाय शहरातील अन्य पांढरपेशी लोकांकडूनही त्यांनी मोठ्या रकमा घेतल्या होत्या, हे तपासात समोर आले. विश्वासचा जुळा भाऊ विनोद यांच्या तक्रारीनुसार संशयित म्हणून नावे असलेल्या आरोपींपैकी राजू दीक्षितला पोलिसांनी अटक केली आहे. दीक्षित सध्या पोलीस कोठडीत आहे. कोठडीतील चौकशीदरम्यान त्याने विश्वास यांच्याकडून पैसे वसूल करण्यासाठी कायदेशीर मार्ग स्वीकारल्याचे पोलिसांना सांगतो आहे. विश्वासच्या मृत्यूमुळे आपल्याला तोटाच होणार होता आणि कोणताही व्यक्ती असा तोटा सहन करू शकत नाही, असे पोलिसांना सांगितले आहे. तर अन्य संशयित मोहसीन बिल्डर आणि पुरुषोत्तम अग्रवाल यांची चौकशी गुन्हे शाखेने केली. शिवाय मोहसीनची चौकशी बेगमपुरा पोलिसांनी बुधवारी केली. मोहसीन हा ब्रोकर आहे. यातूनच त्यांची विश्वाससोबत ओळख झाल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. विश्वासच्या हत्येशी आपला संबंध नसल्याचे मोहसीनचे म्हणणे आहे.
विश्वासच्या पत्नीचा पोलिसांनी नोंदविला जबाब
बेगमपुरा पोलिसांनी मृत विश्वास यांची पत्नी अर्चना यांचा जबाब नोंदविला. त्यांचे म्हणणेही पोलिसांनी जाणून घेतले. शाळा विकसित करण्यासाठी विश्वासने अनेकांकडून पैसे घेतले होते. एकाचे पैसे परत करण्यासाठी त्यांना दुसºयाकडून पैसे घ्यावे लागत. वेळेवर लोकांना पैसे परत करणे त्यांना शक्य होत नसे, यामुळे त्यांचे देणेदारांसोबत वाद होत, असे अर्चना यांनी पोलिसांना सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले.
------------