डिजिटलायझेशनमुळे पोलीस अधिक उत्तरदायी -मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 01:19 AM2018-07-08T01:19:13+5:302018-07-08T01:19:42+5:30

डिजिटलायझेशनमुळे पोलिसांना आता व्यक्तिनिरपेक्ष सेवा द्यावी लागते. मागील तारखेत नोंदी आता करता येत नाहीत. परिणामी पोलीस आता अधिक उत्तरदायी झाले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केले.

 Police more responsive due to digitization - Chief Minister |  डिजिटलायझेशनमुळे पोलीस अधिक उत्तरदायी -मुख्यमंत्री

 डिजिटलायझेशनमुळे पोलीस अधिक उत्तरदायी -मुख्यमंत्री

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डिजिटलायझेशनमुळे पोलिसांना आता व्यक्तिनिरपेक्ष सेवा द्यावी लागते. मागील तारखेत नोंदी आता करता येत नाहीत. परिणामी पोलीस आता अधिक उत्तरदायी झाले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केले.
पोलीस आयुक्त कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर, महापौर नंदकुमार घोडेले, वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ.भागवत कराड, खा. चंद्रकांत खैरे, आ. अतुल सावे, आ.सुभाष झांबड, आ. सतीश चव्हाण, आ. प्रशांत बंब, आ. इम्तियाज जलील, राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, पोलीस महासंचालक (गृहनिर्माण) बिपीन बिहारी, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपा आयुक्त निपुण विनायक, किशनचंद तनवाणी, अंबादास दानवे आदींची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री म्हणाले की, दीड वर्षापूर्वी या इमारतीचे भूमिपूजन आपल्या हस्ते झाले आणि आपणच या इमारतीचे लोकार्पण करीत आहोत. पोलीस आयुक्तालयाची ही इमारत प्रशस्त आणि फंक्शनल अशी आहे. यामुळे येथे बसणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना लोकाभिमुख सेवा देता येईल. येथील पोलीस नियंत्रण कक्ष आधुनिक आहे. कॉर्पोरेट कंपनीच्या कार्यालयास लाजवील असे बांधकाम पोलीस गृहनिर्माण मंडळाने केले. मागील ३० वर्षांत जेवढी पोलीस ठाणी, प्रशासकीय इमारती आणि पोलीस निवासस्थानांची कामे झाली, त्यापेक्षा अधिक कामे मागील तीन वर्षांत झाली आहेत. ज्या पोलिसांकडून आपण २४ तास सेवेची अपेक्षा ठेवतो, त्यांना राहण्यासाठी उत्तम घरे आपण दिली आहेत आणि देत आहोत. राज्यातील सर्व ठाणी सीसीटीएनएसशी आणि सेंट्रल सर्व्हरशी जोडली गेली; त्यामुळे गुन्हेगारांना शोधणे आणि गुन्ह्यांचे विश्लेषण एका क्लिकवर करणे शक्य झाले.
महासंचालक पडसलगीकर म्हणाले की, इमारत बांधकामासाठी प्राप्त झालेल्या एकूण निधीत सव्वाकोटी रुपयांची बचत झाली. उत्तम अशा या इमारतीमुळे येथे काम करणाºया अधिकाºयांना काम करण्यास प्रोत्साहन मिळेल. तर महासंचालक बिपीन बिहारी यांनी पोलीस गृहनिर्माण मंडळाच्या कामाचा लेखाजोखा मांडला.
प्रास्ताविक पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी केले. तर सूत्रसंचालन उपायुक्त डॉ. दीपाली धाटे यांनी केले.

डिजिटल तक्रार नोंदविता येईल
डिजिटल तक्रार करण्याची सुविधा आता उपलब्ध केली आहे. पोलिसांच्या वेबसाईटवर, व्हॉटस्अ‍ॅप, ई-मेलवर तक्रार करता येते. त्यामुळे पोलिसांनी आपली तक्रार घेतली नाही, अथवा तक्रारदार ठाण्यात आलेच नाही, असे कोणालाही म्हणता येणार नाही. परिणामी पोलिसांसमोर आता व्यक्तिनिरपेक्ष सेवा देण्याचे आव्हान असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
इमारतीच्या पायथ्याशी लोकार्पण शिलेचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नंतर मुख्यमंत्र्यांनी आणि अन्य मान्यवरांनी पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीची पाहणी केली.

Web Title:  Police more responsive due to digitization - Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.