एकीकडे पोलिसांची गस्त; तर दुसरीकडे मोंढ्यात फोडली दुकाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 07:39 PM2019-07-26T19:39:24+5:302019-07-26T19:41:31+5:30
रात्रभर डोळ्यात तेल घालून पहारा असला तरी चोरट्यांचा धुमाकूळ
औरंगाबाद : समाजकंटकांच्या बंदोबस्तासाठी पोलिसांनी रात्रभर गस्त सुरू केली खरी; पण चोरट्यांनी पोलिसांच्या नाकावर टिच्चून बुधवारी रात्री जुन्या मोंढ्यातील तीन दुकाने फोडली. याशिवाय रात्रीच्या नाकाबंदीच्या काळातच दोन दिवसांत चोरट्यांनी वेगवेगळ्या भागांतून दोन कारसह सहा वाहने पळविली.
पोलिसांच्या खड्या पाहऱ्याला न जुमानता चोरट्यांनी बुधवारी रात्री जुन्या मोंढ्यातील तीन दुकाने फोडल्याचे समोर आले. एन-३ सिडको येथील रहिवासी महेंद्र बंब यांचे जुना मोंढा येथील दीप ट्रेडर्स नावाचे दुकान रात्री २ वाजेनंतर फोडण्यात आले. चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून गल्ल्यातील चिल्लर, १७ हजारांची रोकड, काजू, बदाम, विलायची व पिस्ता, असा सुमारे दीड लाख रुपयांच्या वस्तू, तसेच मोबाईल फोन पळविला. या दुकानाशेजारी अंबिका ट्रेडर्स नावाचे दुकान आहे. या दुकानाचे शटर चोरट्यांनी फोडले. मात्र, दुकानात काहीच नसल्याने चोरटे रिकाम्या हाताने त्या दुकानातून बाहेर आले. नंतर चोरट्यांनी तेथील बाबूभाई बारदाना नावाचे दुकान फोडले. या दुकानातही चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. गुरुवारी पहाटे ७.३० वाजेच्या सुमारास मोंढ्यात काम करणाऱ्या लोकांनी या घटनेची माहिती दुकानदार बंब यांना कळवली. यानंतर बंब हे दुकानात गेले असता शटर उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि दुकानातील सामान अस्ताव्यस्त करीत त्यांनी चोरी केल्याचे त्यांना दिसले. सहायक पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
पोलिसांवर नामुष्कीची वेळ
समाजकंटकांना रोखण्यासाठी शहराचे अख्खे पोलीस दलच सक्रिय झाले आहे. रात्री ९ वाजेपासून शहरात नाकाबंदी सुरू केली आहे. शिवाय रात्रभर गस्तही वाढविण्यात आली आहे. प्रत्येक ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह गुन्हे शाखा आणि वाहतूक शाखेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही रात्रपाळीची गस्त देण्यात आली. शहरभर पोलीस फिरत असताना मोंढ्यात बुधवारी रात्री चोरीची घटना घडल्याने पोलिसांसमोर चोरट्यांचे आव्हान उभे राहिले आहे.
बिनधास्त चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
दीप ट्रेडर्समध्ये चार सीसीटीव्ही कॅ मेरे आहेत. या कॅमेऱ्यांत चार चोरटे कैद झाले. रिक्षाने आलेल्या चोरट्यांनी लोखंडी टॉमीने दुकानाचे शटर उचकटवले, तसेच त्यांच्यापैकी एक जण दुकानात गेला. दुकानात चोरी करतानाचे चोरट्यांचे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झाले.
स्टेशन रोड आणि सिडकोतून पळविली कार
सिडको एन-६ मधील संभाजी कॉलनीत राहणारे विलास श्रीकि शन डाखोरकर यांनी त्यांच्या मालकीची दहा लाखांची कार (क्रमांक एमएच-२० ईवाय ३७३७) सिडको एन-७ येथे १८ जुलै रोजी उभी केली होती. ही कार चोरट्यांनी चोरून नेली. हा प्रकार समजल्यानंतर विलास यांनी २४ जुलै रोजी सिडको ठाण्यात तक्रार नोंदविली. अन्य एका घटनेत हॉटेलचालक दलजितसिंग ग्यानसिंग महाजन यांच्या मालकीची चार लाखांची कार (क्रमांक एमएच-२० डीजे ६०२५) चोरट्यांनी लंपास केली. ही घटना २३ जुलै रोजी रात्री शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर घडली. दुसऱ्या दिवशी दलजितसिंग यांना हा प्रकार समोर येताच, त्यांनी उस्मानपुरा ठाण्यात तक्रार नोंदविली. हवालदार नरवाडे हे तपास करीत आहेत.
बायजीपुऱ्यातून पळविली मोटारसायकल
बायजीपुरा परिसरातील इंदिरानगर येथे घरासमोर उभी केलेली मोटारसायकल (क्रमांक एमएच-२० ईए ९१४९) चोरट्यांनी २२ जुलै रोजी रात्री चोरून नेली. याविषयी संदीपअप्पा साहेब बांड यांनी जिन्सी ठाण्यात तक्रार नोंदविली.उस्मानपुरा येथील विनोद झंवर यांच्या मालकीची मोटारसायकल (क्रमांक एमएच-२० एयू ५१६६) चोरट्यांनी १८ जुलै रोजी चोरून नेली. याविषयी त्यांनी एमआयडीसी वाळूज ठाण्यात तक्रार नोंदविली. अन्य एका घटनेत औरंगपुरा भाजीमंडईसमोर उभी केलेली दुचाकी (क्रमांक एमएच-२० ईएन ८६५४) चोरट्यांनी १८ रोजी चोरून नेली. याविषयी चंद्रकला रमेश केवट (रा. न्यू हनुमाननगर) यांनी सिटीचौक ठाण्यात तक्रार नोंदविली. कर्णपुरा येथील वॉकिंग प्लाझा येथे उभी केलेली मोटारसायकल (क्रमांक एमएच-२० सीएल ०३९०) चोरट्यांनी लंपास केली. १९ रोजी भरदिवसा ही चोरी झाली. महेश दादाभाई पटेल यांनी छावणी ठाण्यात तक्रार दिली.