रेल्वे अपघातातील मृत कामगारांना पोलिसांची श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:03 AM2021-05-09T04:03:57+5:302021-05-09T04:03:57+5:30
लाॅकडाऊन काळात काम बंद असल्याने जालना येथील लोखंडी सळया बनवणाऱ्या कंपनीत मध्य प्रदेशातील १९ कामगार अडकले होते. त्यांना परिवाराला ...
लाॅकडाऊन काळात काम बंद असल्याने जालना येथील लोखंडी सळया बनवणाऱ्या कंपनीत मध्य प्रदेशातील १९ कामगार अडकले होते. त्यांना परिवाराला भेटण्याची आस लागली होती. भुसावळ येथून रेल्वे मिळणार याची माहिती मिळाल्याने ७ मे २०२० रोजी रात्री हे कामगार जालना येथून भुसावळला जाण्यासाठी औरंगाबादमार्गे पायी निघाले होते. पहाटे ४च्या सुमारास सटाणा शिवारात आल्यानंतर त्यांनी रेल्वे रूळावर विश्रांती घेतली. जालन्याहून औरंगाबादकडे येणाऱ्या मालगाडीखाली पहाटे ५.१५च्या सुमारास १६ तरुण कामगार चिरडले गेले. यातील १४ तरुणांचा जागीच मृत्यू झाला होता तर दोन कामगारांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला होता. रेल्वे रुळापासून अंतरावर झोपलेल्या तीन तरुणांचे प्राण वाचले होते. या अपघाताने महाराष्ट्रसह संपूर्ण देश हादरून गेला होता. या अपघातानंतर केंद्र सरकारने विविध राज्यात अडकलेल्या कामगारांना त्यांच्या घरी जाण्यासाठी रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेण्यास भाग पाडले होते.
या भीषण घटनेला एक वर्षे पूर्ण झाल्याने शनिवारी करमाड पोलिसांच्या वतीने घटनास्थळी मजुरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक पूजा गायकवाड, पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
फोटो ओळ
रेल्वे अपघाताला एक वर्ष पूर्ण झाल्याने घटनास्थळी श्रद्धांजली अर्पण करताना उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.विशाल नेहुल, पोलीस उपअधीक्षक पूजा गायकवाड, पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस आदी.