'पोलीस,पोस्ट, पासपोर्ट', ट्रिपल 'पी' सूत्राच्या स्वीकाराने औरंगाबादच्या पासपोर्ट कार्यालयाची भरारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2022 06:46 PM2022-03-11T18:46:29+5:302022-03-11T18:48:45+5:30
तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण सेवेची प्रतीक्षा, तात्काळ पासपोर्टसाठी गाठावे लागते नाशिक, मुंबई
- साहेबराव हिवराळे
औरंगाबाद : येथील पासपोर्ट सेवा केंद्र टपाल कार्यालयाच्या मदतीने २८ मार्च २०१७ ला सुरू झाले. सेवेमुळे ते महाराष्ट्रात नंबर एक ठरले आहे. परंतु तात्काळ पासपोर्टसाठी नाशिक, मुंबई गाठावे लागते. तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण सेवेची स्मार्ट औरंगाबादकरांना प्रतीक्षाच आहे.
कार्यालयाच्या कक्षा विस्तारणार असून, त्यासाठी पासपोर्ट कार्यालय, पोलीस तसेच पोस्ट अशी ‘कोंबो ट्रिपल पी’ जोमाने कामाला लागली आहे. त्यामुळे पासपोर्ट सेवा केंद्राच्या औरंगाबाद सेंटरची सेवा महाराष्ट्रात सुपर ठरली आहे. मुंबई, नाशिक वाऱ्यांचा दंडात्मक प्रवास आता टळला खरा, परंतु कागदपत्रांची पडताळणी, मुलाखत, पोलिसांकडून पडताळणी त्यानंतर छपाई होऊन १५ ते २० दिवसांत टपाल कार्यालयाच्या जलद सेवेने पासपोर्ट तुमच्या पत्त्यावर येतो. पोलिसांच्या पडताळणीचा रिपोर्ट तात्काळ मिळाला, तर दुसऱ्या दिवशीच तो पाठविला जातो.
पासपोर्ट कार्यालयाने घेतली भरारी...
दोन वर्षात देश-विदेशांची विमान सेवा विस्कळीत असली, तरी १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ पर्यंत जिल्हाभरात १४ हजार ४६८ जणांनी पासपोर्ट घेतला. १ एप्रिल २०२१ ते ३१ जानेवारी २०२२ पर्यंत ३४ हजार ९७१ जणांना पासपोर्ट मिळाल्याची नोंद आहे.
विलंब करीत नाही...
मुंबई-नाशिकहून एका दिवसात, तर औरंगाबादेतून संदेश दोन दिवसांत येतो. त्यामुळे ऑनलाईनने जलद गतीने पोलीस यंत्रणाही काम करीत आहे. वरिष्ठांच्या आदेशाने तात्क़ाळ अर्ज पडताळणी करून ऑनलाईन पासपोर्ट कार्यालयास पाठविला जातो. त्यामुळे आठ ते पंधरा दिवसांत पासपोर्ट हाती पडतो.
- कारभारी नलावडे, विशेष शाखा, सातारा पोलीस ठाणे, औरंगाबाद.
अतिजलदसाठी विस्तार; वरिष्ठांकडेच निर्णय...
अतिजलदची यंत्रणा औरंगाबाद सेंटरला सुरू करण्याची वरिष्ठांच्याच हाती आहे. मार्च महिन्यात सध्यादेखील दररोज ८० अर्जदारांच्या मुुलाखती तसेच कागदपत्र पडताळणीचे काम सुरू आहे. पोलीस, टपाल यंत्रणेमुळे पासपोर्ट लवकरच मिळतो. पोलीस यंत्रणेच्या रिपोर्टवर तात्काळ दुसऱ्यादिवशी पासपोर्ट छपाई विभागातून तो पासपोर्ट प्रिंट होऊन निघण्याची यंत्रणा गतिमान आहे.
- हिमान्शू यादव, अधिकारी, पासपोर्ट सेवा केंद्र, औरंगाबाद