कमलेश पटेल यांच्या मारेकऱ्याचे रेखाचित्र पोलिसांनी केले तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 06:46 PM2020-02-11T18:46:01+5:302020-02-11T18:47:26+5:30
या रेखाचित्राच्या आधारे पोलीस संशयिताचा शोध घेत आहेत.
औरंगाबाद : कुरिअर कंपनीचा व्यवस्थापक कमलेश ऊर्फ प्रकाश जसवंत पटेल (रा. नगारखाना गल्ली, गुलमंडी) यांच्या चारपैकी एका मारेकऱ्याच्या वर्णनाच्या आधारे सिटीचौक पोलिसांनी त्याचे रेखाचित्र तयार केले आहे. या रेखाचित्राच्या आधारे पोलीस संशयिताचा शोध घेत आहेत.
गुलमंडीतील नगारखाना गल्लीतील रामा-मोहन कुरिअर कंपनीचे व्यवस्थापक कमलेश पटेल यांचा दि.३१ जानेवारी रोजी भरदुपारी झालेल्या खुनाचा सिटीचौक पोलीस ठाण्यातील तीन आणि गुन्हे शाखेची तीन पथके तपास करीत आहेत. खून करून पळालेल्या मारेकऱ्यांनी रुमाल बांधून त्यांचे चेहरे झाकले होते. घटनास्थळावरून पळाल्यानंतर पोलिसांनी विविध रस्त्यांवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. शिवाय मोबाईल कॉलच्या आधारे त्यांचा शोध सुरू केला. घटना होऊन ११ दिवस उलटल्यानंतर पोलिसांना एका संशयिताचे वर्णन मिळाले. या वर्णनाच्या आधारे पोलिसांनी संशयिताचे रेखाचित्र तयार के ल्याची माहिती पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली.
ते म्हणाले, आम्ही तयार केलेले रेखाचित्र हे आरोपीच्या चेहऱ्याशी मिळते-जुळते आहे. यामुळे या वर्णनाचा तरुण कुठेही आढळल्यास सिटीचौक पोलिसांशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. एका दुचाकीने ट्रीपल सीट पसार झालेले आरोपी नंतर दोन वेगवेगळ्या मोटारसायकलने वेगवेगळ्या दिशेने गेल्याचे तपासात समोर आले. यापैकी एका मोटारसायकलने दोन जण जळगाव रोडने गेल्याचे स्पष्ट झाले.
रेखाचित्राच्या आधारे मारेकऱ्याचा शोध
हे रेखाचित्र राज्यातील विविध जिल्ह्यांतील पोलिसांना आणि अन्य राज्यांनाही पाठविले जाणार आहे. कमलेश पटेल यांच्या मारेकऱ्यांना आम्ही लवकरच पकडू, असा विश्वास पोलीस निरीक्षक पवार यांनी दर्शविला.