बीड, नेकनूरमध्ये पोलिसांनी बालविवाह रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 06:06 PM2019-05-24T18:06:22+5:302019-05-24T18:07:00+5:30
पालकांचे समुपदेशन करून विवाह रोखण्यात यश
बीड : मुलींचे वय १८ वर्षे पूर्ण नसतानाच त्यांचे विवाह लावून दिले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी तात्काळ चाईल्ड लाईनच्या माध्यमातून धाव घेत नेकनूर व बीड शहरात अशा दोन ठिकाणचे बालविवाह रोखले. दोन्ही ठिकाणी मुलींच्या पालकांचे समुपदेशन करून त्यांना नोटीस बजावण्यात आली.
बीड तालुक्यातील नेकनूर येथे गुरूवारी दुपारी मोरगाव येथील १७ वर्षीय मुलीचा लातुर येथील २२ वर्षीय मुलासोबत विवाह होता. मुलीचे वय कमी असल्याची माहिती मिळताच नेकनूरचे सपोनि मनोज केदारे यांनी पोउपनि किशोर काळे यांनी विवाहस्थळी धाव घेतली. त्यांनी सर्व खात्री करून मुलीच्या पालकांचे समुपदेशन केले. त्यानंतर त्यांना नोटीस बजावून १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय मुलीचे लग्न लावणार नाही, असे लिहून घेतले. यावेळी पोह शरद कदम, दीपक खांडेकर, पवार आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
तर शुक्रवारी दुपारी दीड वाजता बार्शी रोडवरील एका मंगल कार्यालयात बीडमधील १७ वर्षीय मुलीचा काळेगाव हवेली येथील २२ वर्षीय मुलासोबत विवाह होता. लग्नाला एक तासाचा अवधी असताच शिवाजीनगर ठाण्याचे पोनि शिवलाल पुर्भे यांना ही माहिती मिळाली. त्यांनी विशेष शाखेचे आशिष वडमारे यांच्या मार्फत खात्री केली. खात्री पटताच पोलीस विवाहस्थळी दाखल झाले. पालकांना बोलावून घेत कायद्याची माहिती दिली. त्यांचे समुपदेशन करून नोटीस बजावण्यात आली. आशिष वडमारे, पोना गणेश परजणे, पोह रवी प्रधान, मपोशि सुवर्णा ढवळे यावेळी उपस्थित होते.
वऱ्हाडींची निराशा
दोन्ही ठिकाणचे विवाह थाटामाटात पार पडणार होते. सर्व तयारी झालेली होती. कोऱ्या कपड्यांमध्ये वऱ्हाडी मंडळी मंडपात दाखल झाली होती. अवघ्या काही मिनीटांवर मुहूर्त आले असताच पोलिसांनी जावून विवाह रोखला. त्यामुळे वऱ्हाडींची निराशा झाली. काही पाहुणे निराश होऊन घरी परतले तर काही जेवण करून गेले.