'मटका' जुगाराची सेंटर रूमच उध्वस्त;१४ बुकी पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2022 07:24 PM2022-02-04T19:24:58+5:302022-02-04T19:26:55+5:30
पोलिसांनी मटक्याचे सुत्र हालणाऱ्या सेंटर रूमवरच कारवाई केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
पैठण (औरंगाबाद ) : यात्रा मैदानातील 'मटका' अड्ड्याच्या सेंटर रूमवर आज पैठण पोलीसांनी छापा मारला. यावेळी १४ बुकींना पोलिसांनी अटक केली आहे. सेंटरमधून २७ हजार रूपये रोख व मटका बुकिंग घेण्यासाठी लागणारे साहित्य, असा एकूण दीड लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
अलीकडच्या काळात कल्याण मटका जुगाराचे नेटवर्क पैठण शहरात चांगलेच पसरले होते. पोलिसांनी मटक्याचे सुत्र हालणाऱ्या सेंटर रूमवरच कारवाई केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पोलीसांच्या कारवाई नंतर शहरातील अनेक मटका बुकी भूमिगत झाले आहेत. पैठण शहरातील यात्रामैदाना लगत कल्याण मटका चालविणाऱ्यांनी सेंटर रूम थाटले होते. या रूम मधून मटक्याची सर्व सूत्रे हलविण्यात येत होती.
आज पोलीस निरीक्षक किशोर पवार, उपनिरीक्षक अरविंद गटकूळ, महेश माळी, मनोज वैद्य, गणेश शर्मा, गोपाल पाटील, गणेश कुलट यांच्या पथकाने याच रूमवर छापा टाकून कल्याण मटका जुगाराची यंत्रणा उध्वस्त केली. यावेळी तेथे मटका बुकिंग घेणारे १४ बुकी, कल्याण मटका बुकींग सीट, कार्बन बुक, हिशेबाचे कँलक्युलेटर, मोबाईल, मोटारसायकल व रोख २७ हजार रूपये असा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी उपनिरीक्षक अरविंद गटकूळ यांच्या फिर्यादीवरून पोलीस नाईक गोपाळराव पाटील यांनी १४ बुकी विरोधात मुंबई जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय मदने पुढील तपास करीत आहेत.
मटक्याची पाळेमुळे शोधून काढू.....
मटका घेणाऱ्या १४ बुकींना पोलीसांनी अटक केली आहे. शहरात चालणाऱ्या मटक्याची पाळेमुळे शोधून त्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. कुठल्याही प्रकारचे अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाही असा ईशारा पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी दिला आहे.