‘मनसे’च्या सभेवर पोलीस ‘राज’; तीन हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2022 05:21 PM2022-04-30T17:21:08+5:302022-04-30T17:22:29+5:30
बाहेरील जिल्ह्यातून मागवली अतिरिक्त कुमक
औरंगाबाद : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मराठवाडा सांस्कृतिक मैदानावरील सभेसाठी तगडा पोलीस बंदोबस्त असणार आहे. यासाठी जवळपास ३ हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात असणार आहेत. पोलिसांच्या बंदोबस्ताची तयारी पूर्ण झाली असून, शनिवारी (दि. ३०) बाहेरील जिल्ह्यातून अतिरिक्त कुमक दाखल होणार आहे.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरविण्याची मागणी केली आहे. त्यासाठी ३ मेचा अल्टिमेटम दिला आहे. यासाठी मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर सभा आयोजित केली आहे. या सभेला विविध पक्ष, संघटनांनी विरोध दर्शविला आहे. काही संघटनांनी सभा उधळून लावण्याचीही धमकी दिली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सभेला परवानगी देण्यात आली नव्हती. पोलीस आयुक्तांनी आढावा घेतल्यानंतर २८ एप्रिल रोजी सभेसाठी सशर्त परवानगी दिली. पोलिसांनी शुक्रवारी आयुक्तालयात मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत पोलिसांची सुरक्षेच्या दृष्टीने असलेली योजना समजावून सांगितली. त्या योजनेनुसारच सभा पुढे गेली पाहिजे, अशा सूचनाही पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
चार ठिकाणी पार्किंग व्यवस्था
राज ठाकरे यांच्या सभेच्या दिवशी जालना रोडवर ट्राफिक जाम होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेण्यात येत आहे. सभेला येणाऱ्या लोकांच्या गाड्यांसाठी मुख्य पार्किंग ही कर्णपुरा मैदानावर असणार आहे. त्या ठिकाणाहून लोकांना सभास्थळी पोहोचण्यासाठी पक्षाने रिक्षा लावाव्यात, अशा सूचना केल्या आहेत. याशिवाय एम. पी. लॉ, एस. बी. कॉलेजचे मैदान, जिल्हा परिषदेच्या मैदानावर पार्किंगची व्यवस्था असणार आहे. व्हीआयपी गाड्यांसाठी खडकेश्वर मंदिराच्या समोरची जागा पार्किंगसाठी वापरली जाणार आहे.
बाहेरील जिल्ह्यातून येणार फौजफाटा
सभेसाठी बाहेरच्या जिल्ह्यातील ५ पोलीस उपायुक्त, ८ सहायक पोलीस आयुक्त, ३५० पोलीस कर्मचारी, एसआरपीएफच्या ६ तुकड्या येणार आहेत. त्याशिवाय शहरातील दोन हजार पोलीस अधिकारी व कर्मचारीही तैनात असणार आहेत.
बंदोबस्त आकडेवारी
पोलीस आयुक्त : १
उपायुक्त : ८
सहायक आयुक्त : १२
पोलीस निरीक्षक : ५२
एपीआय, पीएसआय : १५६
पोलीस कर्मचारी : २०००
एसआरपीएफ : ६ तुकड्यात ६०० कर्मचारी